चौकशी अहवाल गुलदस्त्यात
By Admin | Updated: May 13, 2014 23:17 IST2014-05-13T23:17:43+5:302014-05-13T23:17:43+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत मांढळ/देव्हाडी येथील पांदण रस्ते अकुशल कामात अनियमितता व शासनाच्या निधीची उधळपट्टी करण्यात आली.

चौकशी अहवाल गुलदस्त्यात
तुमसर : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत मांढळ/देव्हाडी येथील पांदण रस्ते अकुशल कामात अनियमितता व शासनाच्या निधीची उधळपट्टी करण्यात आली. मजुरांना डावलून रोजगार हमीची कामे मशीनने करण्याची तक्रार केल्यानंतर पंचायत समिती मुरूम लिज प्रकरणी चौकशी अहवालानंतर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणात तक्रारकर्ते न्यायालयात जाणार आहेत. मांढळ देव्हाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनेअंतर्गत पांदण रस्ते अकुशल कामे मंजुळा भवसागर ते महादेव चौधरी, तुकडू सेलोकर ते सुर्यकांत सेलोकर, दिलीप चौधरी ते हरीचंद बुधे, ओमकार परमार ते शंकर चौधरी यांच्या शेतापर्यंतची रस्त्याची कामे शासनाचे नियम व निकषाला धाब्यावर बसवून संबंधीतांनी केली आहे. येथे मजुरांच्या हातून गुरूमाचे उत्खनन न करता जेसीबी यंत्राने करण्यात आली. मुरूम उत्खननाची परवानगी मिळालेल्या गटामधून न करता दुसर्याच गटातून करण्यात आली. प्रत्यक्ष चौकशी तलाठी व मंडळ अधिकार्यांनी केली. परंतु चौकशी अहवाल गुलदस्त्यात आहे. पांदण रस्त्यावर मुरूम पसरविण्याची कामे मजूरांकडून न करता ट्रॅक्टरच्या पावड्याने करण्यात आली. दि.२१ मार्च रोजी तक्रारकर्ते उपसरपंच विजय चौधरी यांनी पुरवण्यासहित खंडविकास अधिकारी, तहसीलदार यांना तक्रार केली होती. पंचायत समितीकडून रोजगार हमी विभागातील कर्मचारी व तहसीलदार कार्यालयाकडून तलाठी तथा सक्षम कर्मचार्यांनी मोक्यावर चौकशी केली. चौकशीचा अहवाल खंडविकास अधिकारी व तहसीलदार यांचेकडे सादर करण्यात आला आहे. नायब तहसीलदार मडावी यांचेकडे सध्या हा अहवाल पडून आहे. तक्रारकर्ते विजय चौधरी यांनी नायब तहसीलदार मडावी यांचेशी संपर्क साधल्यावर त्यांनी थातुरमातूर उत्तरे दिली. याठिकाणी दबाव कुणाचा येत आहे हा मुख्य प्रश्न आहे. खंडविकास अधिकार्यांचे कार्यालयसुद्धा मूग गिळून गप्प आहे. चौकशी अहवालात एक तर क्लिनचिट देण्याची गरज आहे नाही तर संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंच विजय चौधरी यांनी केली आहे. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास पुढे न्यायालयात गेल्याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया उपसरपंच चौधरी यांनी दिली. सध्या तुमसर तालुक्यात महात्मा गांधी व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. जिल्हा तथा विभाग स्तरावरील अधिकारी या कामावर पाहणी करीता येत नसल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)