कूलरला महागाईच्या झळा

By Admin | Updated: March 27, 2015 00:15 IST2015-03-27T00:15:17+5:302015-03-27T00:15:17+5:30

मध्यंतरी पावसामुळे वातावरणात गारवा आल्यानंतर कूलर उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. परंतु, वाढत्या तापमानामुळे विक्रेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

Inflation of inflation in the cooler | कूलरला महागाईच्या झळा

कूलरला महागाईच्या झळा

भंडारा : मध्यंतरी पावसामुळे वातावरणात गारवा आल्यानंतर कूलर उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. परंतु, वाढत्या तापमानामुळे विक्रेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. कूलरचे पंप, मोटर, लोखंडी पत्रा आणि वूडवूलच्या किमती वाढले आहे. त्यामुळे यावर्षी कुलरच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाल्याची माहिती उत्पादक अभय भागवत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वाढत्या तापमानात घराला थंडावा देण्यासाठी ‘कूलर’ हवाहवासा वाटतो, पण या वर्षी त्याच्याही किमती गरम झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ जाणवत आहे. महागाईची झळ सोसून उकाड्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी नागरिकांचा कुलर खरेदीकडे कल वाढला आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या डेझर्ट कूलरसह नामांकित ‘ब्रँडेड’चे नवे कूलरही बाजारात दाखल झाले आहेत.


पावसामुळे विक्रीला उशीर
जानेवारीच्या अंतिम सप्ताहापासून कुलरचा व्यवसाय सुरू व्हायचा. पण यंदा त्याचा मुहूर्त मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात निघाला. पावसामुळे कुलर बाजारावर आलेले मंदीचे सावट अखेर दूर झाले आहे. सध्या कुलरच्या विक्रीला जोर चढला आहे. आठवड्यात वाढत्या उन्हामुळे विक्रीत वाढ झाली असली तरीही यावर्षी उशिरा सुरू झालेल्या सिझनमुळे उत्पादकांवर व्याजाचा बोझा वाढला आहे. यावर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, पण तुलनेत विक्री उशिरा सुरू झाल्याने हवी तशी किंमत मिळत नाही. विदर्भातील सर्वात मोठ्या महात्मा फुले बाजारपेठेत खरेदीदारांची गर्दी दिसून आली. पावसामुळे आलेली मरगळ आता दूर झाल्याने व्यापारी खूश आहेत.

होळीनंतर मागणीत वाढ
होळीनंतर तापमानात वाढ झाल्याने उकाडा जाणवू लागला आहे. सायंकाळी गारवा, तर दुपारी उन्हाचे चटके बसू लागले आहेत. या वाढलेल्या तापमानामुळे दुपारी शहरातील रस्ते काहीसे मोकळे होताना दिसत आहेत. सध्या तापमानाने चाळीशी पार केली आहे. सध्या कुलर आणि एअरकंडिशनची मागणी वाढली आहे.

डेझर्ट व प्लास्टिक कूलरला मागणी
वाढत्या उन्हामुळे डेझर्ट कुलरला मागणी असते. खिडकीच्या आकारानुसार किंवा घरात ठेवण्यासाठी अगदी दोन फुटांपासून साडेचार फूट आकारात कुलर आहेत. ‘डेझर्ट’सोबत अनेक नामांकित कंपन्यांचे प्लास्टिकचे कूलर बाजारात आहेत. यासह रूम एसी, विन्डो एसी, टेबल व विन्डो कूलरदेखील उपलब्ध आहेत. कंपन्यांचे कूलर ४ ते १५ हजारापर्यंत ‘डेझर्ट’ची किंमत त्याचा आकार व त्यातील मोटारीनुसार आहे. प्लास्टिकचे कूलर बरेच वर्ष खराब होत नाहीत. याशिवाय विजेचा शॉक लागण्याचीही भीती नसते. त्यामुळे मोठे कूलर उत्पादक प्लास्टिकचा उपयोग मोठ्या प्रमाणात करीत आहे.

महागड्या कूलरचे ग्राहक वेगळे
महागडे कुलर खरेदी करणारा ग्राहकवर्ग वेगळा आहे. स्थानिक पातळीवर तयार होणारे कुलर अवघ्या तीन ते साडेतीन हजार रुपयापर्यंत मिळू लागल्यामुळे त्याची खरेदी जोरात सुरु आहे. फार पूर्वी कुलरची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होती. मात्र व्यावसायिक स्पर्धेत नामांकित कंपन्यांनी आपल्या उत्पादनाची किंमत कमी केली आहे. विशेष म्हणजे आता ग्राहकांच्या खिशात पैसा नसतानाही तो हव्या त्या वस्तूची खरेदी करू शकतो. कूलरसारख्या वस्तूही कर्जावर मिळू लागलेल्या आहेत.

एसीकडे ग्राहकांचा ओढा
वातानुकूलित यंत्र सर्वसामान्यांना बसविणे आता अवघड आहे, असे म्हणणे आता चुकीचे ठरेल. सामान्यही ब्रॅण्डेड कंपनीचा एसी खरेदी करीत आहे. उन्हाळ्यात थोडे जास्त विजेचे बिल भरण्याची त्यांची तयारी आहे. १५ हजार रुपयापासून ते लाखापर्यंत एसी बाजारात उपलब्ध आहे.

खरेदीसाठी सवलतीच्या योजना
विविध नामांकित कंपन्यांच्या एअर कुलरवर सवलतीच्या योजना आहे. प्रथमच रिमोट बेस तसेच आयोनायझर, ह्युमिडीटीफायर व स्लिपमोड अशा वैशिष्ट्यांमुळे काही मिनिटातच थंड गारवा जाणवणारे कुलर बाजारात आहेत. शरीरास पोषक असणारी आयोनायझेशनच्या हवेमुळे सर्दी, डोकेदुखीचा त्रास होत नाही.

आयएसआय मार्कची उपेक्षा
नियमानुसार उत्पादनात आयएसआय मार्कची उपकरणे असणे आवश्यक आहे. वायर, पंप, मोटर आदी वस्तूच्या दर्जाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कूलर सुरू असताना शॉक लागून जीवहानी झाल्याचा घटना घडल्या आहेत. शासकीय यंत्रणा बीआयएसचे याकडे दुर्लक्ष आहे. शासकीय मानकाच्या वस्तू लावल्यास कूलरच्या किमतीत वाढ होईल आणि त्याचा विक्रीवर परिणाम होईल, असे उत्पादकांचे मत आहे.

Web Title: Inflation of inflation in the cooler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.