Infection of summer grains | उन्हाळी धानाला तुडतुड्याची लागण

उन्हाळी धानाला तुडतुड्याची लागण

ठळक मुद्देशेतकरी धास्तावला : कृषी विभागाने सुचविल्या उपायोजना

मुखरू बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : उन्हाळी धानाचा हंगाम अंतीम टप्प्यात असताना हाताशी आलेल्या धानाला तुडतुड्याची लागण झाली आहे. त्यामुळे रसशोषक किडी धानावर तुटून पडल्याने धान पिकांचे नुकसान होत आहे. परीणामी शेतकरी घाबरला असून अपरिपक्व धान कापणीसाठी सरसावलेला आहे.
वातावरणातील बदलाने उन्हाळी धानाचा हंगाम संकटात सापडलेला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून अवकाळी पावसाने धान उत्पादकांचा पाठलाग केल्याने उन्हाळी हंगाम रोगराईच्या सावटातच आटोपावा लागत आहे. गत वर्षीपर्यंत सहसा उन्हाळी धानात रोगांचे प्रमाण अत्यल्प असायचे. मात्र या वर्षाला नियमित ढगाळ वातावरण, गरम व थंड हवामान असल्याने धान पिकावर विविध रोगाचे आक्रमण झालेले आहे. खोडकिडी, मानमोडी, करपा व आता तुडतुडा लागल्याने शेतकऱ्याचे उत्पन्न निश्चितच कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
मंडळ कृषी अधिकारी पालांदूर यांच्या पुढाकारात शेतकऱ्यांना कीड व रोग नियंत्रणासाठी नियमित मार्गदर्शन सुरू आहे. मात्र यामुळे धान उत्पादकांचा खर्च वाढून उत्पन्न नक्कीच प्रभावित झालेले आहे. कापणी, बांधणी व मळणी चा हंगाम तेजीत असताना तुडतुड्याच्या आक्रमणाने फवारणी करणे अनिवार्य झालेले आहे. मजूर टंचाईचा सामना करीत सकाळी व सायंकाळी उन्हाच्या भीतीने फवारणी शेतकºयांनी सुरू केलेली आहे. फवारणीसाठी पूर्व व मोसमी पावसाने बाधा आणल्याने फवारणी सुद्धा करणे जिकरीचे झालेले आहे. मात्र नजरेच्या समोर तुडतुड्याने होत असलेले नुकसान पहावत नसल्याने शेतकरी फवारणी करिता महागडी औषध फवारणी करीत आहे.
धान खरेदी केंद्र हा शेतकºयांना मोठा आधार असल्याने धान खरेदी केंद्राकडे मोठ्या आस्थेने शेतकरी बघत आहे, मात्र अजूनही धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी धान विकण्याच्या विवंचनेत पडला आहे. खाजगीत पडत्या भावाने धान्य विकून प्रति क्विंटल सुमारे तीनशे रुपयाचा नुकसान शेतकरी सहन करीत आहे. निदान ज्या धान खरेदी केंद्राकडे गोदामाची व्यवस्था आहे त्यांनी तरी शेतकºयांच्या हितार्थ उन्हाळी धान खरेदी करण्याकरिता पुढे येत शेतकºयांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.

शक्यतो धान कापणीचा कालावधी लक्षात घेता फवारणी टाळण्याचा प्रयत्न करावा. आठवडाभराच्या अंतरात कापणी शक्य असल्यास फवारणी करू नका. पंधरा-वीस दिवसाचा कालावधी धान कापणी असल्यास तुडतुडा नियंत्रक फवारणी करू शकता.
-पद्माकर गिदमारे,
तालुका कृषी अधिकारी, लाखनी

Web Title: Infection of summer grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.