स्वातंत्र्यापूर्वीच तुमसर नगरपरिषदेवर फडकला होता तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:02 AM2019-08-15T01:02:17+5:302019-08-15T01:02:35+5:30

देशाला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि तिरंगा डौलाने फडकू लागला. मात्र तुमसर नगरपरिषदेवर २ आॅक्टोबर १९२९ रोजीच देशभक्तांनी तिरंगा फडकवून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. महात्मा गांधींनीही या घटनेची दखल घेतली होती.

Before Independence, Tamsar had hit the Municipal Council | स्वातंत्र्यापूर्वीच तुमसर नगरपरिषदेवर फडकला होता तिरंगा

स्वातंत्र्यापूर्वीच तुमसर नगरपरिषदेवर फडकला होता तिरंगा

Next
ठळक मुद्देसहा जणांना वीरमरण : स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांना ‘सळो की पळो’ करून सोडले होते.

मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देशाला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि तिरंगा डौलाने फडकू लागला. मात्र तुमसर नगरपरिषदेवर २ आॅक्टोबर १९२९ रोजीच देशभक्तांनी तिरंगा फडकवून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. महात्मा गांधींनीही या घटनेची दखल घेतली होती. स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असणाऱ्या तुमसर शहरात ब्रिटीशांच्या गोळीबारात सहा जणांना वीर मरण आले होते. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात तुमसरचे नाव अजरामर झाले आहे.
‘करेंगे या मरेंगे’ या ध्येयाने प्रेरित होऊन ब्रिटिशांच्या विरूद्ध संपूर्ण देशात रान पेटले होते. भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरही त्यात आघाडीवर होते. मध्यप्रदेशातील राजधानी नागपूर होते. तर जबलपूर हे दुसरे महत्वपूर्ण केंद्र होते. १८९१ च्या नागपूर अधिवेशनापासून स्वातंत्र्याचे वारे भंडारा जिल्ह्यात पोहचले. तुमसर शहरातील सुशिक्षित वर्गाने स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पुढाकार घेतला. १९२० मध्ये नागपूर अधिवेशनाला तरूण उपस्थित राहिल्याने अनेकांना प्रेरणा मिळाली.
त्या प्रेरणेतूनच तुमसर शहरात स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला होता. २ आॅक्टोबर १९२९ रोजी पो.प. दामले, वासूदेव कोंडेवार आणि विदर्भवीर वामनराव जोशी यांनी तुमसर नगरपरिषदेवर तिरंगा फडकविला. स्वातंत्र्यापूर्वी तिरंगा फडकविणारे तुमसर हे एकमेव शहर असावे.
या घटनेने ब्रिटिशांचा तीळपापड झाला. संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. महात्मा गांधींनीही या घटनेची दखल घेत वीर जवानांचे कौतुक केले.
विदर्भात सर्वाधिक स्वातंत्र्यसंग्राम सैनिक
स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्वाची बाजी लावण्यात तुमसर आघाडीवर होते. या शहरात विदर्भात सर्वाधिक स्वातंत्र्य संग्राम सैनिक असून १६७ जणांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली होती, अशी शासन तफ्तरी नोंद आहे. मोहाडी येथे ३५ स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी लढ्यात भाग घेतला. चुल्हाड येथील स्वातंत्र्य संग्राम सैनिक भीवाजी अंबुले यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत गौरव करण्यात आला होता. तुमसरचे नाव स्वातंत्र्य लढ्यात अजरामर झाले आहे.
असा झाला होता गोळीबार
तुमसरमध्ये स्वातंत्र्य लढ्याने चांगलाच जोर पकडला होता. सकाळी प्रभातफेरी आणि रात्री गुप्त बैठका होत होत्या. १० आॅगस्ट १९४२ ला माकडे गुरूजी व भिवाजी लांजेवार यांना अटक झाली. त्याच रात्री बाबुजी लांजेवार यांच्या अन्नपुर्णा राईस मिलमध्ये गुप्त बैठक घेण्यात आली. ८० सदस्य उपस्थित होते. या बैठकीत करेंगे या मरेंगे चा निर्धार करण्यात आला. मात्र ही माहिती पोलिसांना मिळाली. सर्कल इन्स्पेक्टर गोपालसिंग व तुमसरचे इन्स्पेटक्टर रवानी, सहायक दिलावर खान, महम्मद शफी यांच्या मदतीला भंडारा येथून कुमक बोलाविण्यात आली. मोहाडी येथे तरूणांनी खड्डे खोदून कुमक अडविण्याचा प्रयत्न केला. भंडाराचे स्पेशल मॅजिस्ट्रेट जयवंत रात्रीच तुमसरला पोहचले होते. नागरिक जुन्या गंज बाजारातून पोलीस ठाण्याकडे आग लावण्याकडे जावू लागली. १४ आॅगस्ट १९४२ चा तो दिवस होता. वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा नागरिक देत होते. वातावरण चिघडले. पोलिसांनी जमावावर सुरूवातीला लाठीमार केला. नागरिकांनी दगडफेक करत प्रतिउत्तर दिले. जमाव पोलीस ठाण्याच्या दिशेने सरकू लागला. ठाणेदार रवानी यांच्या पत्नीने हाती पुस्तूल घेवून जमावाला धमकाविण्याचा प्रयत्न केला. पाहता पाहता गोळी चालली. श्रीराम धुर्वे या तरूणाच्या डोळ्यात गोळी शिरली आणि तो जागीच गतप्राण झाला. जमाव भडकला. पोलिसांनी बेधुंद गोळीबार केला. मॅजिस्ट्रेट जयवंत यांनीही गोळीबार करण्यासाठी सुरूवात केली. या लढ्यात श्रीराम धुर्वे, भदूजी रामाजी लोंदासे, श्रीहरी काशिनाथ फाये (करडी), पांडूरंग परसराम सोनवाने, भुवाजी बालाजी वानोरे, राजाराम पैकु धुर्वे शहीद झाले तर १३० नागरिक जखमी झाले.
देव्हाडी रेल्वेस्थानक जाळण्याची होती तयारी
देव्हाडी येथील बाजार चौकातील सभेत रामचंद्र दशरथ फाये, पन्नालाल यांची भाषणे झाली. त्यानंतर मुंबई हावडा मार्गावरील देव्हाडी रेल्वेस्थानक जाळण्याचा निर्धार करण्यात आला. परंतु दोघांनाही पोलिसांनी पकडले. त्यामुळे रेल्वे स्टेशन जाळण्याचा प्रयत्न असफल झाला.

Web Title: Before Independence, Tamsar had hit the Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.