वाढत्या उन्हाने पशू-पक्ष्यांनाही हवी ‘सावली’

By Admin | Updated: May 9, 2017 00:24 IST2017-05-09T00:24:35+5:302017-05-09T00:24:35+5:30

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे.

Increasingly, animal-birds also need 'shadow' | वाढत्या उन्हाने पशू-पक्ष्यांनाही हवी ‘सावली’

वाढत्या उन्हाने पशू-पक्ष्यांनाही हवी ‘सावली’

अंगाची लाहीलाही : उष्माघाताचे ठरतील बळी
प्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. उष्माघाताचा फटका बसणाऱ्या चिमणी, कावळे, कबूतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्था यामुळे भंडाराकर त्रस्त झाले आहेत. या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण गार पाणी, सरबतचा आधार घेताना दिसत आहे. मात्र, वाढत्या उष्माने त्रस्त पशू-पक्षांचे काय? असा प्रश्न साहजिकच मनात येतो. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता भंडाराकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापलेल्या उन्हामुळे माणसांप्रमाणे पशू-पक्ष्यांनाही त्रास होत आहे. उन्हाळ्यात माणासाला भूक कमी लागते, अपचन होते तसेच कधी कधी नाकातून रक्तस्त्राव होतो, तर काहींना हीटस्ट्रोकही येतो. माणसांत दिसून येणारी ही लक्षणे प्राण्यांमध्येही दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशू-पक्षी सावलीत बसतात. मात्र, सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्मापासून वाचवू शकत नाहीत.
ज्या प्राण्यांना उष्माचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्माचा मोठा फटका बसतो.
पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. त्यांना दम लागतो. तसेच हीटस्ट्रोक होतो. भोवळ येऊन ते पडतात, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर वनविभाग व वन्यप्रेमी मदतीसाठी पुढाकार घेतील काय? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

हिरवळीचा अभाव
उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी झाडांच्या सावलीचा आधार घेतात. मात्र, अलीकडे हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आधार शोधावा लागत आहे. अशी खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करतात. ज्यांच्या घरी पाळीव जनावरे आहेत, अशांनी कडाक्याच्या उन्हाच्या वातावरणादरम्यान प्राण्यांना, पक्ष्यांना योग्य, असा आहार द्यावा.
अशी घ्या काळजी
घरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. पाळीव प्राणी बहुतांश वेळ घरातील चार भिंतीत असतात. घरातील तापमान आणि बाहेरील तापमानात फरक असतो. या प्राण्यांना सारखे घराबाहेर घेऊन गेले की, ते अस्वस्थ होतात. ज्या घरांत एसी आहे, अशा घरातील प्राण्यांना घराबाहेर लगेच नेल्यास त्यांनाही उष्म्याचा त्रास होतो. प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी घेऊन जावे. पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.
पशू-पक्ष्यांसाठी ‘वॉटरपॉर्इंट’
पक्ष्यांना पाणी पिण्यास मिळावे म्हणून दोन झाडांच्या आधारे किंवा झाडावर बांबूच्या आधारे तीन भांडी अडकवून ‘वॉटरपॉर्इंट’ तयार करावे. यात एका भांड्यात पाणी, एका भांड्यात धान्य आणि तिसऱ्या भांड्यात गवत, कापूस ठेवून छोटासा बेड करावा. यात वॉटरपॉर्इंटवर पाणी पिण्यासाठी अनेक पक्षी येतात. ही व्यवस्था निवासी वसाहतीतही नागरिकांनी केल्यास पशू-पक्षांचे जीव वाचविण्यास मदत करता येईल.

ग्रामीण भागातील पशुपालक पशुधनांना सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चराईसाठी शेतशिवारात किंवा जंगलात नेतात. वास्तविकतेत उन्हाची तिव्रता वाढल्याने पशुधनांना सकाळी ६ ते सकाळी ११ पर्यंत आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत चराईसाठी नेल्यास उष्माचा त्रास जाणवणार नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मानवासोबतच पशुधनांनाही पाण्याची गरज भासते. दिवसातून ५ ते ६ वेळा पशुधनांना पाणी पाजणे गरजेचे आहे. मात्र, जनावरांना सकाळी व सायंकाळी अशा दोनच वेळी पाणी पाजले जाते. यामुळे दुधात घट होते व शरिरातील पाणी कमी होत असल्याने त्याचा परिणाम पशुधनांवर पडतो. त्यामुळे पशुधनांची काळजी घेणे गरजेचे आहे.
- गुणवंत भडके,
पशुविकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना, मानेगाव.

Web Title: Increasingly, animal-birds also need 'shadow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.