वायू प्रदुषणामुळे डोळे, श्वसनाच्या आजारात वाढ
By Admin | Updated: December 23, 2016 00:36 IST2016-12-23T00:36:22+5:302016-12-23T00:36:22+5:30
देव्हाडा बुज स्थित मानस अॅग्रो साखर कारखान्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

वायू प्रदुषणामुळे डोळे, श्वसनाच्या आजारात वाढ
मानस अॅग्रो कारखाना : चौकशीची मागणी
करडी (पालोरा) : देव्हाडा बुज स्थित मानस अॅग्रो साखर कारखान्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. कारखान्याचे धुराळ्यामुळे हवेतील प्रदुषण वाढले आहे. हवेतील कणांमुळे डोळे व श्वसनाचे आजार वाढीस लागले आहेत. कारखाना प्रशासनाला याबाबत माहिती असूनही प्रदूषण रोखण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. सदर कारखाना सत्ताधारी नेत्यांचा असल्याने प्रदुषण मंडळ डोळेझाक करीत असल्याचा आरोप करित प्रकरणी त्वरित चौकशी करुन कारवाईची मागणी होत आहे.
देव्हाडा/ नरसिंगटोला स्थित वैनगंगा शुगर अॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्याचे नामांतर नुकतेच मानस अॅग्रो युनिट क्रमांक ४ या नावाने करण्यात आले आहे. सदर कारखाना पुर्ती उद्योग समुहाच्या मालकीच्या खाजगी कारखाना आहे. सुरुवातीपासून येथील कारखान्याच्या नावावर राजकारण्यांनी आपली पोळी शेकली आहे. रोजगार, बेरोजगारांना काम, ऊसाला सर्वाधिक भाव, १५ दिवसात ऊसाचे व कामगारांचे वेतन, विज निर्माण उद्योग, वर्षभरात लखपती शेतकरी तसेच परिसराची प्रगती, उन्नती, भरभराटी करण्याचे अच्छे दिन आणण्याचे आश्वासन कारखान्याच्या पहिल्याच गाळप हंगामात जिल्हयातील लोकांना साक्षी ठेवून दिले होते. आज त्यांचे पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात आहेत. मात्र, आज त्यांच्या आश्वासनाचे गड ढासळतांना दिसत आहेत. विज प्रकल्प अजुनही उभे राहिले नाही. शेतकऱ्यांना लखपती करण्याचे सोडा चांगले भाव मिळत नाही. चार-सहा महिने उसाचे चुकारे मिळत नाही. मुठभर बेरोजगारांना रोजगार यातून मिळाला असला तरी कुशल कामगारांनाही अत्यल्प वेतन दिले जाते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली असतांना येथील कामगारांना पहिल्या आयोगाचाही वेतन मिळत नाही. परिसरातील शेतकऱ्यांनी, नागरिकांनी सत्ताधारी पक्षावर भरभरुन प्रेम केले असतांना त्यांना अच्छे दिन अजुनही आलेले नाही असा आरोप आहे. मानस अॅग्रो कारखान्यामुळे हवेचे प्रदुषण वाढले आहे. रात्रंदिवस धुर ओकणाऱ्या धुराळ्यातुन ऊसाचे बारिक कण मोठ्या प्रमाणात हवेत तरंगत आहेत. काळे कण देव्हाडा ते करडी राज्य मार्ग २७२ वरुन जाणाऱ्या वाहन चालकांचे डोळ्यात जखम करण्यास कारणीभूत ठरत आहेत. परिसरातील देव्हाडा, नरसिंगटोला, निलज बुज. आदी गावात या कणांमुळे श्वसनाचे आजार वाढीस लागले आहेत. कारखाना प्रशासन व प्रदुषण नियंत्रकांकडून डोळेझाक केली जात आहे. कारखाना मोठ्या राजकारण्यांच्या प्रभावातील असल्याने बोर्ड कारवाईचे धाडस केले जात नाही. डोळ्याचे आजार व हृदयाचे आजार वाढीस लागल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळाने दबावात न येता त्वरित चौकशी करुन कारवाईची मागणी पं.स. सदस्य महादेव पचघरे, निलजचे ग्रा.पं. सदस्य गणेश गाढवे, ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)