हातपंप व विहिरीवर वाढली गर्दी
By Admin | Updated: May 20, 2017 00:55 IST2017-05-20T00:55:01+5:302017-05-20T00:55:01+5:30
भीषण उष्णता आणि गावात असलेली पाणी टंचाईमुळे गावात आरो पाण्याची मागणीत कमालीची वाढ झाली आहे.

हातपंप व विहिरीवर वाढली गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : भीषण उष्णता आणि गावात असलेली पाणी टंचाईमुळे गावात आरो पाण्याची मागणीत कमालीची वाढ झाली आहे. गावात असलेल्या सार्वजनिक व खासगी विहिरी यासह हातपंपावर गर्दी वाढली आहे. मुबलक प्रमाणात घरीच पाणी उपलब्ध होत असल्यामुळे कधीही घराबाहेर न पडणाऱ्या महिला, पुरुष आणि बच्चे कंपनी आता हातात गुंड घेऊन घराबाहेर पडताना दिसतात आहेत. मिळेल त्या साधनाने पाणी एकत्र करण्याबरोबर घराघरात आरोचे पाणी विकत घेण्याची परंपरा दिसत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून भीषण उष्णतेचा काळ सुरू आहे. सकाळपासूनच रस्ते निर्मनुष्य होतात. अशा परिस्थितीत पाण्याविना राहणे कठीणच. त्यातल्यात्यात नदीपात्रातील पाणी आटल्यामुळे गावात पाणी टंचाई मुळे गावकरी संकटात सापडला आहे. टंचाईवर मात करण्यासाठी सर्व स्तरावरून आपापल्या सोयीने मार्ग काढणे सुरू आहे.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आरो पाणी उत्तम पर्याय ठरत आहे. या पाण्यामुळे गावात सरळ घरी शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे. निदान पिण्यासाठी पाणी मिळाले तर उर्वरित कामासाठी विहीर किंवा हातपंपाचे पाण्याने काम भागते असा समज रुजत आहे. एकंदरीत आरो चे घरपोच पाणी लोकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी उपयोगी पडत आहे.
सध्या लग्नसराईची वेळ सुरू आहे. वरठी येथे ग्राम पंचायत मार्फत लग्न कार्यासाठी टँकरने पाणी पुरवठा होत असल्यामुळे आरामात पाण्याचे काम भागत होते. आता ही सेवा बंद झाल्यामुळे लग्न घरी चिंतेचे सावट आहे.
आरो पाण्यामुळे पिण्याचा प्रश्न मिटू शकतो पण घरी इतर कामासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न उत्पन्न होत आहे. ज्यांच्याकडे विहिरी नाहीत त्यांना पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
आरो पाणी वाटपात स्पर्धा
वरठी येथे पाणी टंचाई असल्यामुळे भीषण संकट असल्याची माहिती सर्वदूर पोहचली आहे. यामुळे वरठी येथे आरो पाणी विकण्याच्या धंदा फर्मात आला आहे. सकाळपासून गावात आरो पाणी विकणाऱ्या वाहनांची गर्दी पहावयास मिळते. आरोचे शुद्ध पाणी विकणाऱ्या गर्दी वाढल्यामुळे गावात स्वस्त आणि सहज पाणी उपलब्ध होत आहे.
हातपंपावर गर्दी
गावात २५ सार्वजनिक विहीर आहेत. पण यापैकी चारच विहिरीचे पाणी पिण्यायोग्य आहे. त्याबरोबर २८ हातपंप असून यापैकी ६ नादुरुस्त आहेत. मोठ्या प्रमाणात इतर पाण्याचे स्रोत असूनही गावकरी चुकूनही या साधनाचा वापर करत नव्हते. पण गावात नळाला पाणी येणार नाही कळताच सार्वजनिक विहीर आणि हातपंपावर गर्दी वाढली आहे. मिळेल त्या साधनाने पाणी भरण्यासाठी रांगा वाढत असून. काहीजण सोईनुसार रात्री उशिरापर्यंत पाणी भरत असल्याचे दिसतात.