जलयुक्त अभियानात लोकसहभाग वाढवा
By Admin | Updated: May 7, 2017 00:25 IST2017-05-07T00:25:36+5:302017-05-07T00:25:36+5:30
शासकीय योजना कार्यान्वीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुणवत्तापूर्ण विकास कामे करण्याची जबाबदारी लोक सहभागाव्दारे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे.

जलयुक्त अभियानात लोकसहभाग वाढवा
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : सेंदूरवाफा येथे जलयुक्त शिवाराचा आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासकीय योजना कार्यान्वीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुणवत्तापूर्ण विकास कामे करण्याची जबाबदारी लोक सहभागाव्दारे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या अभियानात लोकसहभाग मोठ्या प्रमाणात घेण्यात यावा. लक्षावधी लोकांच्या जीवनात बदल करण्याचे सामर्थ्य जलयुक्त शिवार अभियानात आहे. जलयुक्त शिवरची कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले.
शासकीय तंत्रनिकेतन सेंदूरवाफा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. शासनाच्या धोरणानुसार महत्वाचे जलयुक्त शिवार अभियानातील प्रस्तावित २०१६-१७ या वषार्तील कामे ३१ मे २०१७ पूर्वी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. यावेळी आमदार राजेश काशिवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सुर्यवंशी, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर, साकोली उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय कृषी अधिकारी एस.के.सांगळे, तहसिलदार अनिल खडतकर, लाखनी तहसिलदार राजीव शक्करवार, लाखांदूर तहसिलदार यु.एस.मेश्राम, खंड विकास अधिकारी सुनिल तडस, खंड विकास अधिकारी ब्राम्हणकर, खंडविकास अधिकारी देवीदास देवरे उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार राजेश काशिवार यांनी शेतकरी हिताचे धोरणानुसार शासन सिंचन क्षेत्रावर निधी उपलब्ध करुन देत असून पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी समन्वय साधून जलदगतीने विकास कामे पूर्ण करावे. आढावा बैठकीत साकोली उपविभागाअंतर्गत २०१६-१७ चे जलयुक्त शिवार मधील प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला. साकोली तालुक्यात २९४ प्रस्तावित कामांपैकी ८५ कामे रद्द झाली. यापैकी ७८ कामे कामे पूर्ण झाली असून ७३ कामे सुरु आहेत.व ५८ कामे सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. लाखनी तालुक्यातील ३७५ प्रस्तावित कामांपैकी ११३ कामे रद्द झाली आहेत. यापैकी ७७ कामे पूर्ण तर ५६ कामे प्रगतीपथावर असून १२९ कामे सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. लाखांदूर तालुक्यात १५६ प्रस्तावित कामापैकी १४ कामे रद्द झाली असून ७६ कामे पूर्ण झाली आहेत. ५६ कामे प्रगतीपथावर असून १० कामे सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. संचालन व आभार तालुका कृषी अधिकरी चौधरी यांनी केले.