सरपंच सदस्यांच्या मानधनात वाढ
By Admin | Updated: September 27, 2014 23:10 IST2014-09-27T23:10:49+5:302014-09-27T23:10:49+5:30
शासनाने सरपंचाच्या मानधनात दुपटीने वाढ केल्याने सरपंचांना दिवाळीपूर्वीच भेट दिली आहे. गत आठवड्यात या संदर्भातील अध्यादेश पारित करून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना

सरपंच सदस्यांच्या मानधनात वाढ
रवीन्द्र चन्नेकर- बारव्हा
शासनाने सरपंचाच्या मानधनात दुपटीने वाढ केल्याने सरपंचांना दिवाळीपूर्वीच भेट दिली आहे. गत आठवड्यात या संदर्भातील अध्यादेश पारित करून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. सरपंचाना लोकसंख्येनिहाय देण्यात येणाऱ्या मानधनात राज्य शासन ७५ टक्के तर ग्रामपंचायतीतून २५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.
सरपंचाच्या मानधनाबरोबरच सदस्यांच्या बैठक भत्त्यातही तब्बल आठ महिने वाढ करण्यात आली आहे. २५ रूपयांवरून हा भत्ता २०० रूपयांवर पोहोचला आहे. एरवी मासिक बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या सदस्यांची वाढत्या भत्त्यांमुळे बैठकांना उपस्थिती वाढणार आहे. यापूर्वी दोन हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंंचांना ८०० रूपये मानधन दिले जात होते. नव्याने हे मानधन अनुक्रमे एक हजार, एक हजार ५०० रूपये, दोन हजार रूपये करण्यात आले आहे.
सदस्यांचा बैठक भत्ता १० रूपयांवरून २५ रूपये करण्यात आला आहे. हा भत्ता १२ बैठकीपुरताच मर्यादित राहणार आहे. मर्यादीपेक्षा जास्त बैठकीसाठी भत्ता दिला जाणार नाही. यात संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांनी ही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायत सदस्यांना बैठक भत्ता देण्याकरिता, ग्रामपंचायतीला येणाऱ्या खर्चाकरिता शासन १०० टक्के अनुदान देणार आहे. यात लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली आहे. त्यांना दरमहा दिली जाणारी किमान वेतन अदा केल्यानंतर सरपंच मानधन आणि सदस्य बैठक भत्ता अनुज्ञेय राहील. सरपंच आणि ग्रामसेवक यांची संयुक्त जबाबदारी राहील. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत सरपंच मानधन आणि सदस्य बैठक भत्तेच्या पूर्वी कामगारांचे वेतन द्यावे लागणार आहे. सरपंचाचे मानधन व सदस्यांच्या भत्त्यात वाढ झाली असल्याने मासिक बैठकीत उपस्थिती पूर्णपणे राहील. यात विकासाचे निर्णय घेणे शक्य होईल. मानधन हे लोकसंख्येनुसार देण्यात येणार असून काही नियमसुद्धा देण्यात आले आहे हे विशेष.