खातेदारांची वाढ; बँक कर्मचाऱ्यांत कपात
By Admin | Updated: June 28, 2014 23:26 IST2014-06-28T23:26:50+5:302014-06-28T23:26:50+5:30
४७ गावांची प्रमुख बाजारपेठ, राष्ट्रीयकृत बँकात खाते उघडण्याचे शासनाचे धोरण, यामुळे सिहोरा गावात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकाच्या अभावाने खातेदारांची कोंडी होत आहे. गावात बँकांच्या शाखा

खातेदारांची वाढ; बँक कर्मचाऱ्यांत कपात
चुल्हाड (सिहोरा) : ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ, राष्ट्रीयकृत बँकात खाते उघडण्याचे शासनाचे धोरण, यामुळे सिहोरा गावात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकाच्या अभावाने खातेदारांची कोंडी होत आहे. गावात बँकांच्या शाखा वाढविण्याची ओरड असताना सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
सिहोरा परिसरात अंदाजे पाऊण लक्ष लोकसंख्या आहे. ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ असल्याने नागरिकांची वर्दळ याच गावात आहे. नागरिकांचा रोजचा संपर्क बँकेसोबत आहे. या बँकात दिसणारी गर्दी नाकीनऊ आणत आहे. परंतु नागरिकांचा नाईलाज आहे. सकाळपासून नागरिकांची गर्दी बँकाच्या दारावर दिसून येत आहे. मध्यंतरी लिंकफेल झाल्यास खातेदारांना चक्रावून सोडत आहे. यात दोष बँकेत कार्यरत कर्मचाऱ्यांचा नाही, व्यवस्थापनाचा आहे. नियोजनकर्त्यांचा आहे.
बँकेत खातेदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. शासनाचे धोरण, योजनांची अंमलबजावणी, यामुळे एका व्यक्तीचे बँकेत ३-४ बचत खाते आहेत. या खात्याचा उपयोग योजनापुरताच आहे. नंतर मात्र राशीचा दुष्काळ आहे. एकच बचत खाता अन्य योजनांना जोडण्याचे धोरण शासन स्तरावर राबविण्यात येत नाही. यामुळे नागरिक भ्रमित आहेत. या गावात राष्ट्रीयकृत बँक आॅफ इंडिया ही एकमेव शाखा आहे. या शाखेत कर्मचारी अल्प आहेत. सुरुवातीपासून तितकेच टेबल आहेत. खातेदार वाढत असताना टेबल मात्र वाढले नाहीत. हेच खरे कारण आहे.
खातेदारांची गर्दी बघून कर्मचाऱ्यांना रोज घाम फुटत आहे. परंतु कुणी गाऱ्हाणे ऐकणारे नाहीत. या बँकेत व्यावसायीक, विद्यार्थी, पेन्शनधारक, रोहयो, बचतगट तथा अन्य खातेदारांचा महापूर आहे. सकाळी ८ वाजेपासून खातेदार बँकेच्या दारावर तळ ठोकून उभे राहत असतात.
अन्य बँकांची हीच अवस्था आहे. या बँकाच्या कामकाजात वाढ झाली आहे. वाढत्या कामाच्या व्यापाने विश्रांती घेणारी सुटी आता कर्मचाऱ्यांना दिसेनाशी झाली आहे. बँकांच्या बाबतीत सिहोरा परिसरावर अन्याय होत असल्याचे खुद्द कर्मचारीही ठासून सांगत आहेत. या त्रासदायक प्रश्नावर मात्र लोकप्रतिनिधी शांत आहेत. एरवी जनआंदोलनासाठी चर्चेत असलेल्या सिहोरा परिसरात मात्र बँकांच्या वाढीसाठी कधी आवाज निघाला नाही. यामुळे खातेदारांना कधी अच्छे दिन दिसणार किंवा नाही असा प्रश्न पडला आहे.
तुमसरात बँकांचा पाऊस आहे. परंतु धानाचे उत्पादन घेणाऱ्या सिहोऱ्यात मात्र बँकेच्या नव्या शाखेसाठी ओरड सुरू आहे. याकडे वरीष्ठांनी लक्ष द्यावे.(वार्ताहर)