संशयित रोख व्यवहारावर राहणार आयकर विभागाची नजर

By Admin | Updated: October 25, 2016 00:21 IST2016-10-25T00:21:36+5:302016-10-25T00:21:36+5:30

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून..

The income tax department's eye on suspected cash transactions will remain | संशयित रोख व्यवहारावर राहणार आयकर विभागाची नजर

संशयित रोख व्यवहारावर राहणार आयकर विभागाची नजर

विधान परिषद निवडणूक : आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
भंडारा : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून संशयित रोख व्यवहार व बँक व्यवहारावर आयकर विभागाची नजर राहणार आहे. निवडणू संबंधीत व्यक्तींनी कुठल्याही माध्यमातून केलेले बँक व्यवहार तसेच परदेशवाऱ्या व सहली यावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. यात दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिले.
या पत्रपरिषदेत गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ, भंडाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.अहीरे, गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रदीपकुमार डांगे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विजय उरकुडे उपस्थित होते.
विधानपरिषद निवडणुकीची भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीत आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दोन्ही जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्यात आले असून तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. अवैध दारू विक्री व डेली स्टॉक नियंत्रित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मिडीयावरील प्रचारावर पोलीस विभागाच्या सायबर सेलकडून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर नागरिकांनी जपून करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
विधान परिषद निवडणुकीशी संबंधित संशयित बँक व्यवहार व परदेशवाऱ्या यावर आयकर विभागामार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मोठे तसेच रोखीचे बँक व्यवहार आयकर विभागाच्या संशयाच्या टप्प्यात असणार आहेत. अशा व्यवहाराची शंका असल्यास पुराव्यानिशी तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
या निवडणुकीसाठी लागणाऱ्या परवानगीसाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्यात येणार आहे. बॅनर, पोस्टर तातडीने काढण्यासंदर्भात नगरपालिका मुख्याधिकारी व खंडविकास अधिकारी यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान नवीन कामांच्या निविदा प्रकाशित करणे, प्रशासकीय मान्यता देणे किंवा भूमीपूजन करणे यावर प्रतिबंध असणार आहे.
२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध
भंडारा-गोंदिया प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून २६ आॅक्टोबर रोजी अधिसूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर आहे. ३ नोव्हेंबर रोजी अर्ज छाननी, 5 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ नोव्हेंबर रोजी मतदान होईल तर २२ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
३९३ मतदारसंख्या
या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या ३९३ एवढी आहे. यात भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद भंडारा ५९, नगर परिषद भंडारा ३५, नगर परिषद तुमसर २५, नगर परिषद पवनी १९, नगर पंचायत मोहाडी १९, नगर पंचायत लाखनी १९, नगर पंचायत लाखांदूर १९ असे भंडारा जिल्ह्यातील १९५ तर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद गोंदिया ५९, नगर परिषद गोंदिया ४४, नगर परिषद तिरोडा १९, नगर पंचायत गोरेगाव १९, नगर पंचायत सडकअर्जुनी १९, नगर पंचायत देवरी १९, नगर पंचायत अजुर्नी (मोरगाव) १९ असे १९८ स्थानिक प्राधिकारी संस्थेचे सदस्य मतदार आहेत.
चार प्रारूप मतदान केंद्र
या निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली, गोंदिया जिल्ह्यात तहसिल कार्यालय सडकअर्जुनी व मनोहर नगर परिषद हायस्कुल गोंदिया ४ प्रारूप मतदान केंद्र राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
भंडाऱ्यात राहणार स्ट्राँगरूम
भंडारा-गोंदिया स्थानिक मतदार संघ निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्रावर मतदान होईल. मतमोजणी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून करण्यात येईल. मतपेट्या ठेवण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात स्ट्राँगरूम निश्चित करण्यात आली आहे.
२१ आॅक्टोबर रोजी प्रारूप मतदान केंद्राची यादी प्रसिध्द करण्यात आली असून प्रारूप मतदान केंद्राच्या यादीवर २८ आॅक्टोबरपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत. राजकीय पक्षांना प्रचार, वाहन व सभेसाठी परवानगी देण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा व गोंदिया असे प्रत्येकी एक पथक नेमण्यात आले आहे. यासाठी भंडारा येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडून परवानगी देण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The income tax department's eye on suspected cash transactions will remain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.