पीक विम्यात सर्वच पिकांचा समावेश करा
By Admin | Updated: August 31, 2016 00:22 IST2016-08-31T00:22:53+5:302016-08-31T00:22:53+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कर विभागाला दरवर्षी व्यवसाय कर भरत असते. तरी आयकर विभाग विविध ...

पीक विम्यात सर्वच पिकांचा समावेश करा
सुनिल फुंडे यांची मागणी : जिल्हा देखरेख संस्थेची आमसभा
भंडारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कर विभागाला दरवर्षी व्यवसाय कर भरत असते. तरी आयकर विभाग विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडे व्यवसाय कर भरण्याचा तगादा लावतात. या संस्था व्यवसायिक संस्था नसून शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत करणाऱ्या संस्था आहेत. त्यामुळे संस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांनी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय कर भरू नये व्यवसाय करासाठी विरोध करावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले.
जिल्हा देखरेख समितीच्या आमसभेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, लाखांदूर, साकोली, तुमसर तालुक्यातील गट सचिवांनी २०१४-२०१५ चे व्याज प्रस्ताव अद्यापही सादर केलेले नाही. गटसचिव मंडळी संस्थेसह बँकेचे किती नुकसान करतात याचा विचार संस्थांनी करायला हवा. तरीही संस्था कर्ज वाटप करा असे म्हणतात आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बँकेचे संचालक मंडळ सतत नकारात्मक भूमिका घेऊन कर्ज पुरवठा करीत असतो. संस्थेचे आर्थिक व इतर सर्व व्यवहार हेच गट सचिव करीत असल्यामुळे या गटसचिवांवर संस्थांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जे गट सचिव भ्रष्टाचार करत असतील त्यांना पाठीशी घालू नये. अन्यथा भ्रष्टाचार व नुकसान संस्थेच्या अध्यक्षावर लागतील. यावेळी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, असा ठराव घेण्यात आला.
आमसभेला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, संचालक प्रशांत पवार, नरेंद्र बुरडे, कैलाश नशिने, अशोक मोहरकर, प्रेमसागर गणवीर, सत्यवान हुकरे, रामदयाल पारधी, रामराव कारेमोरे, होमराज कापगते, विलास वाघाये, योगेश हेडाऊ, जिल्हा उपनिबंधक संजय क्षीरसागर, सहाय्यक निबंधक विलास देशपांडे, किशोर बोबडे, राजेश मदान व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्षांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)
प्रशिक्षण देण्याचे काम कृषी अधिकाऱ्यांचे
राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशात केवळ धान आणि सोयाबीन या पिकांचा व पिक विम्यात समावेश केला आहे. त्यामुळे इतर पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे तातडीने शासनाने सर्वच पिकाचा पिक विम्यात समावेश करावा असा ठराव जिल्हा देखरेख संस्थेच्या आमसभेत घेण्यात आला. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम हे कृषी अधिकाऱ्यांचे आहे. जिल्हा बँक शेतकरी व शासनाच्या मधला दुवा आहे, असे सुनिल फुंडे यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यात ३८२ सेवा सहकारी संस्था असून ४०१ संस्था सभासद आहेत. या संस्थांचे एकुण भाग भांडवल ३९ हजार ५६० रुपये एवढे असून १६ हजार ७ रुपयाचा राखीव निधी आहे. संस्थेच्या आस्थापनेवर मार्च १६ अखेर ६८ गट सचिव व ६ शिपाई कार्यरत आहेत. संस्थांचा वाढता व्याप लक्षात घेता गट सचिवांची संख्या अतिशय कमी आहे. म्हणून गट सचिवांच्या नियुक्तीसाठी पत्र पाठविण्यात आले आहेत. बैद्यनाथन समितीने सेवा सहकारी संस्थांना स्वायत्य संस्था म्हणून अधिकार बहाल केले आहेत. सन २००८ ते २०१६ या वर्षात १२ ते १५ संस्थांनी गट सचिवांची पदे भरली आहेत. इतर संस्थांनी मात्र ही पदे भरलेली नाहीत. ज्या संस्थांमध्ये गट सचिवांची पदे रिक्त आहेत त्या संस्थांनी गट सचिवांची पदे भरून घ्यावीत.