आदिवासी महिला शेतकरी उत्पादक संघाचे उद्घाटन
By Admin | Updated: November 19, 2016 00:39 IST2016-11-19T00:39:24+5:302016-11-19T00:39:24+5:30
आपला दैनंदिन जीवनमान बदलवून सुसंस्कृत वातावरणाशी समरस होवून गुण्यागोविंदाने कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी परंपरागत धानाच्या शेतीला बगल देणे गरजेचे आहे.

आदिवासी महिला शेतकरी उत्पादक संघाचे उद्घाटन
कृषी अधिकारी तुमडाम: महिलांनी प्रक्रिया उद्योग करावे
बोंडगावदेवी : आपला दैनंदिन जीवनमान बदलवून सुसंस्कृत वातावरणाशी समरस होवून गुण्यागोविंदाने कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी परंपरागत धानाच्या शेतीला बगल देणे गरजेचे आहे. उत्पादित शेती मालावर प्रक्रिया करण्यासाठी आदिवासी महिला शेतकऱ्यांनी नि:संकोचपणे पुढे येवून व्यवसाय करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले.
तालुक्यातील ईळदा या आदिवासी गावातील आदिवासी महिला शेतकरी उत्पादक संघाचे उद्घाटन करून नोंदणी प्रमाणपत्र हस्तांतरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. प्रकल्प संचालक आत्मा तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ईळदा येथे आदिवासी महिला शेतकरी उत्पादक संघाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, आत्मा गोंदियाचे उपप्रकल्प संचालक के.आर. सराफ, कृषी पणन तज्ज्ञ कुंभार, तालुका तंत्रज्ञ व्यवस्थापक व्ही.एच. कोहाडे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी तुमडाम म्हणाले, आदिवासी महिलांनी व्यवसाय क्षेत्रात पुढे यावे. आपल्या कुटुंबाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी पारंपरिक शेतीला बगल देवून निर्माण करण्यात आलेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फत बियाणे विक्री करणे, खत विक्री करणे, धानापासून तांदूळ बनविणे यासारखे प्रक्रिया उद्योग करणे, मिरची पावडर, हळद ईत्यादी व्यवसाय करण्यासाठी धडाडीने पुढे आल्यास निश्चितपणे आर्थिक सुबत्ता नांदेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यानंतर के.आर. सराफ यांनी मानव विकास अंतर्गत प्रात्यक्षिक, यांत्रिकीकरण, बिजोत्पादन कार्यक्रम, जैविक/सेंद्रीय शेती, बाजारामध्ये ज्या वस्तूंची मागणी आहे त्या वस्तूंचे उत्पादन घेणे, कंपनीमार्फत बँक उभारणे, कंपनीला थेट पणन परवाना, कीटकनाशके, खते विक्री परवाना उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ईळदा येथे एकत्र येवून महिलांनी तयार केलेल्या आदिवासी महिला शेतकरी उत्पादक संघाचे नोंदणी प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांच्या हस्ते महिला प्रवर्तकांना देण्यात आले. संचालन संगीता कोवे यांनी केले. आभार अलका मडावी यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील महिला शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)