खरीप पिकाची सुधारित आणेवारी ६४ पैसे
By Admin | Updated: November 15, 2014 22:41 IST2014-11-15T22:41:01+5:302014-11-15T22:41:01+5:30
धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची

खरीप पिकाची सुधारित आणेवारी ६४ पैसे
शेतकरी संकटात : जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न?
देवानंद नंदेश्वर - भंडारा
धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी ६४ पैसे घोषित केली आहे. परिणामी शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून धान कापणीपर्यंत दृष्काळसदृश्य स्थिती असताना आता पिक परिस्थिती उत्तम कशी राहिल, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.
जिल्ह्यात खरीपाचे पीक एक लक्ष ९९ हजार १७९.९४ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. त्यापैकी एक लक्ष ७९ हजार ४६ हेक्टर क्षेत्रात धानपिकाची लागवड करण्यात आली. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी ६५ टक्के पाऊस झालेला आहे. भंडारा तालुक्यात २६ हजार ५८० हेक्टर, मोहाडी तालुक्यात ३२ हजार ११७ हेक्टर, तुमसर तालुक्यात २९ हजार २३३ हेक्टर, लाखनी तालुक्यात २२ हजार ४८८ हेक्टर, साकोली तालुक्यात १८ हजार ०४० हेक्टर, पवनी तालुक्यात २४ हजार ७५७ हेक्टर, लाखांदूर तालुक्यात २५ हजार ८३१ हेक्टर क्षेत्रात धान पिकांची लागवड करण्यात आली होती.
जिल्हा प्रशासनाने ८४७ गावांची सुधारीत हंगामी आणेवारी ६४ पैसे दर्शविली आहे. यातील ७ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ८४० गावे ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या सात गावांमध्ये मोहाडी तालुक्यातील तीन व तुमसर तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे. ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४० गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १७० गावांची पैसेवारी ६५ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०५ गावांची पैसेवारी ६५ पैसे, तुमसर तालुक्यातील १३९ गावांची पैसेवारी ७३ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ५७ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ६६ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ६४ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ६१ पैसे दाखविण्यात आली आहे. यातील ३१ गावे अकृषक पाण्याखाली पिक असल्यामुळे त्या गावांची पैसेवारी जाहिर करण्यात आली नाही.
यामध्ये भंडारा तालुक्यातील चार, तुमसर तालुक्यातील सात, पवनी १६, साकोली दोन, तर लाखनी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८७८ एकूण गावांपैकी ८५७ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. १० गावांमध्ये दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये खरीप पिकांची पेरणी केलेल्या रबी गावे आहेत. यापैकी ८४७ गावांच्या खरीप पिकांची पैसेवारी जाहिर करण्यात आली. ८४७ गावापैकी ८४० गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यापुर्वी झालेल्या नजरअंदाज पैसेवारी ७४ पैसे घोषित करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दि. १५ जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या अंतिम आणेवारीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.