दुग्धजन्य पदार्थांची मध्य प्रदेशांतून आयात
By Admin | Updated: October 25, 2014 22:34 IST2014-10-25T22:34:18+5:302014-10-25T22:34:18+5:30
मध्य प्रदेशातून महाराष्ट्राचा सीमावर्ती शहरात दुग्धजन्य पदार्थासह ‘खोवा’ मोठया प्रमाणात चोरटया मार्गाने आणला जात आहे. हा खोवा तुमसर, भंडारा व नागपूरच्या बाजारात विकले जात आहे.

दुग्धजन्य पदार्थांची मध्य प्रदेशांतून आयात
पदार्थाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : तुमसर, भंडारा शहरात दररोज येते खेप
तुमसर : मध्य प्रदेशातून महाराष्ट्राचा सीमावर्ती शहरात दुग्धजन्य पदार्थासह ‘खोवा’ मोठया प्रमाणात चोरटया मार्गाने आणला जात आहे. हा खोवा तुमसर, भंडारा व नागपूरच्या बाजारात विकले जात आहे. या खोव्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह असून दुग्धजन्य पदार्थाच्या वाहतुकीबाबत अन्न व पुरवठा प्रशासन विभाग अनभिज्ञ आहे.
महाराष्ट्राच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत. तुमसर-कंटगी व तुमसर-वाराशिवनी हा आंतरराज्यीय महामार्ग तुमसर तालुक्यातून जातो. बावनथडी व वैनगंगा नदीपलीकडून मध्य प्रदेश राज्याच्या सीमा सुरु होतात. नदीपलीकडील मध्य प्रदेशातील शेकडो गावात दुभत्या जनावरांची संख्या मोठी आहे.
या गावापासून मध्य प्रदेशातील बालाघाट हे एकमेव शहरही लांब अंतरावर आहे. या शहरात दुग्धजन्य व खोव्याला पाहिजे तेवढी मागणी नाही. त्यामुळे या परिसरातील स्थानिक छोटे मोठे व्यापाऱ्यांनी तुमसर, भंडारा व नागपुरकडे आपला मोर्चा वळविला आहे. स्थानिक व्यापारी कमी किमंतीत दुग्धजन्य पदार्थ व खोवा घेतात. त्यानंतर हा खोवा आणि दुग्धजन्य पदार्थ अधिक किंमतीत महाराष्ट्रातील लगतच्या शहरात विकतात. मागील अनेक महिन्यापासून हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे.
नदीअलीकडे दोन्ही राज्याचे तपासणी नाके आहेत. तरीसुद्धा त्याठिकाणी तपासणी केली जात नाही. परिणामी या पदार्थाची राज्याच्या सीमेत आवक सुरू आहे. तुमसर व भंडारा येथील चारचाकी वाहने दुध खरेदी करुन दररोज आणतात.
या पदार्थाच्या गुणवत्तेवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मध्यप्रदेश व महाराष्ट्र शासनाची या आयात - निर्यातीला परवानगी आहे का? याबाबत अनभिज्ञता आहे.
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील जबलपूर येथून दुग्धजन्य पदार्थाची नियमित निर्यात होत आहे. भंडारा जिल्हा मुख्यालयात अन्न व औषध प्रशासन विभाग असून या विभागात डझनभर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनी अजुनपर्यंत तपासणी व कारवाई केल्याचे ऐकीवात नाही.
तुमसर, भंडारा येथील मिष्ठान्न दुकाने, हॉटेलात दुग्धजन्य पदार्थाच्या तपासणीची माहिती घेतल्यास सत्य उघडकीस येऊ शकते. परंतु मांजरीच्या गळयात घंटा बांधणार कोण? हा मुख्य प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)