मंदिराच्या भिंतीला ट्रॅव्हल्सची धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST2021-02-23T04:53:38+5:302021-02-23T04:53:38+5:30
लाखनी (भंडारा) : साकोलीकडून भंडाऱ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हनुमान मंदिराच्या भिंतीला ...

मंदिराच्या भिंतीला ट्रॅव्हल्सची धडक; एक ठार
लाखनी (भंडारा) : साकोलीकडून भंडाऱ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हनुमान मंदिराच्या भिंतीला धडक दिल्याने एक इसम जागीच ठार झाला, तर ३४ जखमी झाले. त्यापैकी सहा व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रविवारी (दि.२१) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. पोलीसपाटील सुरेश मते यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी ट्रॅव्हल्सचालक विलास डोंगरे (३९) वाठोडा (नागपूर) याच्यावर गुन्हा दाखल केला. प्रशांत संपतराव गायकवाड (६०) जयताळा, नागपूर असे मृताचे नाव आहे.
नागपूर, प्रतापनगर येथील एका युवकाचा किरणापूर (गोंदिया) येथील युवतीशी विवाह समारंभ निश्चित झाला. ट्रॅव्हल्सने (क्र.एमएच ४० बीजी ४०९३) ३० ते ३५ वऱ्हाडी मंडळी आले होते. विवाह समारंभ आटोपून परतीच्या प्रवासात पिंपळगाव/सडक तालुका लाखनी येथे ट्रॅव्हल्सचालकाला टुलकी लागली. यातच भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत असलेल्या हनुमान मंदिराच्या भिंतीला ट्रॅव्हल्स धडकली. यात प्रशांत गायकवाड हे जागीच ठार झाले. या घटनेत ३४ वऱ्हाडी जखमी झाले. पोलीसपाटील सुरेश मते, वामन भेंडारकर, राहुल चौधरी यांनी याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे लाखनी पोलिसांना दिली. रुग्णवाहिकेकरिता १०८ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर, पोलीस हवालदार सुभाष राठोड, अक्रम पठाण, पोलीस शिपाई संदीप वाघ तथा रुग्णवाहिका घटनास्थळी आली. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे पाठविण्यात आले. कर्तव्यावरील वैद्यकीय चमूने जखमींवर उपचार करून किरकोळ जखमींना सुटी दिली. गंभीर जखमी झालेले सुरेश गायकवाड (४९), अरुण मेंढे (५९), राजन लांजेवार (४१), प्रवीण गायकवाड (४५), अजय जीवने (४३), वांशिका निकोसे (१५) सर्व राहा. नागपूर) यांना पुढील उपचारार्थ भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लाखनी पोलिसांनी ट्रॅव्हल्सचालक विलास दौलत डोंगरे (३९, वाठोडा, नागपूर) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घरडे तपास करीत आहेत.