चंदन मोटघरे
लाख नीः जिल्ह्यात नवीन धान खरेदी केंद्राची निर्मिती करण्यात आली तसेच जुन्या केंद्राचे पुनर्निर्माण करण्यात आले. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी नवीन व जुन्या १४९ धान खरेदी केंद्रायची पुनर्रचना केल्याने तालुक्यातील साकोली तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीचे ४ धान खरेदी केंद्र बंद झाले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गाव एका विशिष्ट धान खरेदी केंद्राला जोडणे आवश्यक असल्याने धान खरेदी केंद्रापासून अंतराच्या दृष्टीने जवळ असलेल्या गावांची जोडणी खरेदी केंद्राला करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लाखनीचे धान खरेदी केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आले. तालुक्यातील गडेगाव, किन्ही, केसलवाडा (वाघ), गराडा, सीपेवाडा, चान्ना, धानला, सोमलवाडा ,मेंढा, मुरमाडी (सा.), सावरी, सोनेखारी, लाखनी, खुर्शिपार, मलकाझरी, नवेगाव, पुरकाबोडी, दैतमांगली ही गावे खरेदी-विक्री संस्थेऐवजी कृषी उत्पन्न बाजार समितीला जोडण्यात आली. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ,बोदरा ला खरेदी-विक्री संस्थेचे सातलवाडा केंद्र जोडले आहे. वाल्मिकी सुशिक्षित बेरोजगार बहुद्देशीय सहकारी संस्था मर्या. सानगडी यांना खरेदी-विक्री संस्थेचे परसोडी केंद्र देण्यात आले. समुत्कर्ष अटल अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था मर्यादित एकोडीला खरेदी-विक्री संस्थेचे एकोडी केंद्र जोडण्यात आले आहे. सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीची स्थापना १९६० मध्ये करण्यात आली होती. गेल्या ६० वर्षांपासून शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे, शेतकऱ्यांना स्वस्त दरात बियाणे, खते उपलब्ध करून दिले जातात. महत्त्वपूर्ण धान खरेदी केंद्र खरेदी-विक्री संस्थेपासून तोडण्यात आल्याने उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार आहे. स्थानिक लाखणीचे केंद्र बंद झाल्याने खरेदी-विक्रीच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सहकार चळवळ वाढविण्यासाठी व शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी लाखनी व साकोली तालुक्यातील सहकार महर्षींनी खरेदी-विक्रीची स्थापना केली होती. तोट्यात असलेली खरेदी-विक्री संस्था नफ्यात आणली संस्थेची नवीन इमारत तयार करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक धान खरेदीचा पुरस्कार खरेदी-विक्री संस्थेला मिळाला होता. पणन अधिकाऱ्यांनी खरेदी विक्री संस्थेचे चार खरेदी केंद्र बंद करून समितीचे निम्मे काम कमी केले आहे.
खरेदी-विक्री केंद्र लाखनी येथे काही गावे पुन्हा जोडण्यात येणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून विनंती करून बंद झालेले केंद्र पुन्हा खरेदी-विक्री संस्थेला जोडण्यात येणार आहेत.
- घनश्याम पाटील खेडीकर, सभापती, सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्था.