अभयारण्य परिसरातून सागवनांची अवैध तस्करी
By Admin | Updated: May 19, 2016 00:29 IST2016-05-19T00:29:08+5:302016-05-19T00:29:08+5:30
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य परिसरातून सागवानांची होणारी अवैध तस्करी वन विभागाच्या सतर्कतेमुळे उजेडात आली.

अभयारण्य परिसरातून सागवनांची अवैध तस्करी
वन विभागावर दबाव आणण्याचा प्रयत्न
भंडारा : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य परिसरातून सागवानांची होणारी अवैध तस्करी वन विभागाच्या सतर्कतेमुळे उजेडात आली. याप्रकरणी ट्रकचालक जोगेंद्र अशोक निर्वाण (३३) रा. लाखनी याला अटक करून त्याच्यावर भारतीय वन अधिनियम ४१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पवनी तालुक्यातील पाऊणगाव शिवारातून अवैधरीत्या सागवनाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती भिवापूर वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच वनपाल आर. डी. वलथरे यांनी रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कर्मचाऱ्यांसह नागपूर-गडचिरोली महामार्गावरील भिवापूर चेक पोस्ट नाक्यावर सापळा रचला. पाऊणगावकडून नागपूरच्या दिशेने निघालेला एमएच-३६/एफ-२०९७ क्रमांकाच्या ट्रकमधून अवैधरीत्या सागवनाची वाहतूक केली जात असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले.
या कारवाईत ५६ हजार रुपयांच्या वैध मुद्देमालासह १.७३ घनमीटर अवैध सागवन आढळून आले. त्याची किंमत ३१,३९४ रुपये आहे. तर ४९५० रुपयांचा अवैध जळाऊ भर, ७,२५० रुपयांचा चॉक टिंबर तसेच पाच लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण ५ लाख ९९ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी रात्री उशिरा भिवापूर वन कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ अवैध सागवानाचा ट्रक जप्त करताच मध्यरात्रीपासून सोमवारी दिवसभर अनेकांनी हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न केले. पवनी येथील एका स्वयंभू नेत्याने तर बड्या नेत्यांपासून ते मंत्रालयापर्यंतच्या ओळखीचा दाखला दिला. कंत्राटदार नरेश तलमले हासुद्धा यावेळी हजर होता. परंतु, वन विभागाने ताठर भूमिका घेत कारवाई केली. (नगर प्रतिनिधी)