लाखनी : शासनाने भंडारा जिल्ह्यातील काही रेतीघाटांचा लिलाव केला असताना लाखनी तालुक्यातील चुलबंध नदीपात्रातील अनुक्रमे मऱ्हेगाव, लोहारा, पळसगाव, भूगाव, विहीरगाव, सोनमाळा, मिरेगाव, डोंगरगाव घाटातील दर्जेदार रेती उत्खनन करून नजीकच्या शेतशिवारात साठवून ठेवत नंतर विक्रीसाठी पाठविली जाते. त्यामुळे या चुलबंध शिवारास अवैध ‘सॅण्ड डंपिंग यार्ड’ चे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे दिसते.
या रेती तस्करीला अप्रत्यक्षरीत्या स्थानिक झोलाछाप नेत्यांसह महसूल, खनिकर्म व पोलीस प्रशासनाचा वरदहस्त लाभला असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. लाखनी तालुक्यात चुलबंद परिसरात वर उल्लेख केलेल्या रेतीसाठी प्रसिद्ध असलेले घाट आहेत. यातील एकाही घाटाचा लिलाव करण्यात आलेला नाही. मात्र, या सर्व घाटामधून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा राजकीय नेत्यांच्या पदाचा गैरवापर करून व बडेजाव दाखवून सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे.
ही उपसा केलेली रेती स्थानिक खासगी, घरकुलांच्या तसेच शासकीय बांधकामांवर साठवणूक करून ठेवली जाते व त्याच ठिकाणावरून इतरत्र सुरू असलेल्या बांधकामांवर सर्रास पालांदुरातील शासकीय कार्यालय तसेच चक्क पोलीस ठाण्यासमोरूनच संपूर्ण प्रशासन खरेदी केल्याच्या आविर्भावात वाहतूक करून पोहोचवली जाते. चुलबंध नदीतीरावरील कित्येक गावांत कित्येक ठिकाणी मोठमोठे अवैध रेतीचे ढिगारे आढळून येतात. आधीच आर्थिक व्यवहार पूर्ण होत असल्याने संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी या रेतीसाठ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात.
पालांदूर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मऱ्हेगाव रेतीघाटातून उपसा करण्यास स्थानिक पालांदूर परिसरातील रेतीतस्कर आघाडीवर आहेत. ही मंडळी स्थानिक झोलाछाप नेत्यांना हाताशी धरून रोज मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत रेतीचा अवैध उपसा करतात.
बॉक्स
पथके नेमूनही उपसा सुरूच
लाखनी तालुक्यातील रेती तस्करीला आळा घालण्याकरिता मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्या सहकार्याने महसूलचे पथक नियुक्त केले आहे; परंतु या पथकाने किती व कोणती कारवाई केली? हा संशोधनाचा विषय आहे. आपल्यावर कारवाई करण्यासाठी पथक येणार ही खबर रेती तस्करांना कोण देतो? रेती तस्करांना राजकीय मदत कोण करतो? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. चुलबंध नदीवरील रेतीघाटांचे लिलाव केल्यास राज्य शासनाला किमान सहा ते सात कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो.
बॉक्स
रस्त्यांची दैनावस्था
रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रेतीघाट परिसर व संबंधित घाटाजवळील गावांलगतच्या रस्त्याची अतिशय दैन्यावस्था झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या रेती वाहतुकीला विरोध केल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रेती माफियांचे हस्तक दादागिरी करीत स्थानिक राजकीय हितसंबंध असलेल्या झोलाछापांचा धाक दाखवून दबंगगिरी करीत असल्याने त्यांचा विरोध करण्यास कोणीही धजावत नाही. रेती तस्करीला कायमस्वरूपी आळा बसवायचा असेल तर जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन पालांदूर (चौ), मुरमाडी(तूप.), भूगाव व खराशी येथील मुख्य चौकात पोलीस व महसूल विभाग मिळून कायमस्वरूपी बैठेपथक स्थापन करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.