दारुची अवैध विक्री
By Admin | Updated: November 13, 2015 00:48 IST2015-11-13T00:48:37+5:302015-11-13T00:48:37+5:30
अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत कोंढा येथून मोठ्या प्रमाणात अवैधपणे दिवसरात्रीला देशी दारुची वाहतूक केल्या जात आहे.

दारुची अवैध विक्री
कोंढा (कोसरा) : अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत कोंढा येथून मोठ्या प्रमाणात अवैधपणे दिवसरात्रीला देशी दारुची वाहतूक केल्या जात आहे. याची माहिती अड्याळ पोलिसांना असताना देखील ते याकडे लक्ष देत नाही. विशेष म्हणजे कोंढा येथील अवैध दारु चंद्रपूर जिल्ह्यात जात असल्याची माहिती आहे.
कोंढा, कोसरा येथे देशी दारुचे तीन परवानाप्राप्त दुकाने आहेत. कोंढा येथील दुकानातून दररोज २०० ते ३०० दारुच्या पेट्या चारचाकी गाडीने भरधाव गाडीने नेल्या जात आहे. अनेकदा या गाड्याचे अपघात झाले. पण पोलिसांशी चिरीमिरी करून प्रकरण दडपल्या गेले आहे. नवरात्र उत्सवात कोंढा गावातून मारुती व्हॅनने अवैधपणे देशी दारुच्या पेट्या वाहतूक करून नेत असताना वाहनात बिघाड झाल्याने अनेक गावकऱ्यांनी दारुच्या बाटल्या पाहिल्या. आजूबाजूच्या खेड्यात देखील दोनचाकी व इतर साधनाने दारु वाहतूक करून अवैधपणे विक्री केले जाते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंद आहे. तेव्हा चंद्रपूर जिल्हा पवनी तालुक्याला लागून असल्याने कोंढा गावातील दुकानातून अवैधपणे दारुची वाहतूक केली जात आहे.
अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत कोंढा हे बिट पैसे देणारी सोन्याची अंडी समजली जाते. म्हणून हे बिट सोडण्यास कोणताच पोलीस कर्मचारी तयार नसतो. सध्यातरी अवैध दारु विक्रेते बिट जमादारामार्फत २० ते ४० हजार रुपये ठाणे प्रमुखांना देत असल्याची माहिती आहे. अवैध धंद्यात वाढ झाली असून कोंढा हे बीट शांत समजल्या जात होते. ते राहिले नाही. दारु दुकाने उघडण्याची वेळ ठरली आहे. पण कोंढा व कोसरा येथील परवानाप्राप्त देशी दारुचे दुकाने सकाळी सुरु होत असतात. दारुच्या बंदच्या दिवशी देशी विदेशी दारु खुलेआम अवैधपणे विकले जात आहे. त्यामुळे गावाची शांतता भंग होत असल्याच्या घटना घडत असल्याचे दिसुन येत आहे. यावर लक्ष देणे गरजेचेआहे. (वार्ताहर)