लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कारधा ते निलज राज्य मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात वापरण्यात आलेल्या अवैध मुरुमाच्या उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करीत क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन केल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने रस्ते काम करणाऱ्या कंपनीवर ठेवला आहे.सदर कंपनीने नियम धाब्यावर ठेवून तलाव व शेतशिवारातील उत्खनन केल्याने कंपनीकडून कोट्यावधी रुपयांचा महसूल वसूल केल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गत दीड वर्षांपासून कारधा ते निलज या राज्यमार्गाचे काम सुरु आहे. यासाठी एका कंपनीने रस्ते कामासाठी मुरुम व मातीचे ठिकठिकाणी उत्खनन केले आहे. विनापरवाना उत्खनन केला असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. आतापर्यंत लघु पाटबंधारे विभागाच्या १६ पैकी १४ तलावांमध्ये नियमांचे उल्लंघन करीत उत्खनन झाल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत समोर आला आहे. त्यामुळे सदर कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा प्राधीकरणाच्या कार्यकारी अभियंत्याना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले यांनी या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर हा सर्व गैरप्रकार उघडकीस आला आहे. शासनाची परवानगी न घेता उत्खनन करीत सीमांकन न करता उत्खनन आणि तलावाच्या पाळीपासून सुरक्षित अंतर न ठेवता उत्खनन झाले असल्याने यावर सदर कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे.शासकीय परवानगीपेक्षा खोदकाम अधिक केल्याने तलावात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भंडारा तालुक्यातील चोवा, दवडीपार, पचखेडी येथील तलावातून जास्तीचे उत्खनन झाले आहे. पचखेडी येथील तलावात जिल्हाधिकाºयांची परवानगी न घेता अवैध उत्खनन केल्याची माहिती आहे. या सर्व प्रकरणात दोषी असलेल्या कंपनीवर कारवाईचे मागणी होत आहे.कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मुरुमाचे उत्खननाचे काम सुरु असताना पैसे कमाविले. रस्ते कामात मुरुमाऐवजी मातीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याने पावसाळ्यात वाहतुकीचा धोका वाढला आहे. रस्ता चिखलमय झाला असून काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या प्रकरणात काय कारवाई करते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.रस्त्याने वाहनधारक झाले त्रस्तपवनी मार्गाचे गत काही दिवसांपासून काम सुरु आहे. या कामात मुरुमाऐवजी मातीकामाचा वापर करण्यात आल्याने पावसाने रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचला आहे. त्यामुळे दुचाकीधारकांना रस्त्यावरुन जाने धोकादायक ठरत आहे. पवनी तालुक्यातील कोसरा गट क्रमांक १२०७, विरली खंदार गट क्रमांक १५१, कातुर्ली गट क्रमांक ६३८, कोदुर्ली गट क्रमांक १९१ तसेच नेरला गट क्रमांक ६६७, सेलोटी गट क्रमांक १५१ यांनी तयार केलेले उत्खनन प्रस्तावित खोलीपेक्षा जास्त झाले आहे.कोसरा गटक्रमांक १२०७ मध्ये दहा हजार क्यूबीक मीटर मुरुम उत्खनन करण्याची परवानगी कंपनीने घेतली होती. ही परवानगी लघु पाटबंधारे जिल्हा परिषद भंडारा यांनी दिली होती. याची माहिती लघु पाटबंधारे विभागाला आहे.- जगदिश कुंभारे,तलाठी, कोसरा
रस्त्यासाठी मुरुमाचे अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST
कंपनीने नियम धाब्यावर ठेवून तलाव व शेतशिवारातील उत्खनन केल्याने कंपनीकडून कोट्यावधी रुपयांचा महसूल वसूल केल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गत दीड वर्षांपासून कारधा ते निलज या राज्यमार्गाचे काम सुरु आहे. यासाठी एका कंपनीने रस्ते कामासाठी मुरुम व मातीचे ठिकठिकाणी उत्खनन केले आहे.
रस्त्यासाठी मुरुमाचे अवैध उत्खनन
ठळक मुद्देकारधा ते निलज मार्गावरील प्रकार : कोट्यावधींचा शासनाचा महसूल बुडाला