धनेगाव शिवारात मुरुमाचे अवैध खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST2021-07-22T04:22:18+5:302021-07-22T04:22:18+5:30

चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात वन विभागाच्या जागेत खनन माफिया विना रॉयल्टीने मुरुमाचे अवैध खोदकाम करीत आहेत. धनेगाव शिवारात ...

Illegal excavation of Muruma in Dhanegaon Shivara | धनेगाव शिवारात मुरुमाचे अवैध खोदकाम

धनेगाव शिवारात मुरुमाचे अवैध खोदकाम

चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात वन विभागाच्या जागेत खनन माफिया विना रॉयल्टीने मुरुमाचे अवैध खोदकाम करीत आहेत. धनेगाव शिवारात मुरुमाचे ढीग तयार करण्यात आले आहेत. महसूल व वन विभागाच्या डोळ्यादेखत राजरोसपणे मुरूम खोदकाम सुरू असताना कारवाई करण्यात येत नाही. यात माफियांचे साटेलोटे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शासकीय जागेत जीवघेणे खड्डेच खड्डे तयार झाले आहेत. अवैध मुरूम खोदकाम कंत्राटदाराच्या अंगलट येणार असून, चुल्हाडात दंड वसूल करण्यात येणार आहे.

सिहोरा परिसरात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत गावात सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहेत. चुल्हाडात सिमेंट रस्त्याच्या कडेला विना रॉयल्टीचे मुरूम घालण्यात आले आहे. गावांच्या शेजारी असणाऱ्या तलावातून विनापरवाना गावातील काही चोरट्यांना हाताशी घेऊन मुरुमाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. हजारो ब्रास मुरूम खोदकाम करण्यात आल्यानंतर महसूल विभागाला जाग आली आहे. अवैध मुरूम खोदकाम केल्याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शासकीय कामात विना रॉयल्टीचा मुरूम कंत्राटदाराच्या अंगलट आला आहे. लाखो रुपयांची बचत करण्याचा बेकायदा प्रकार कंत्राटदाराने केला आहे. यामुळे मुरुमाचे अवैध खोदकाम केल्याप्रकरणी गुप्ता नामक कंत्राटदाराच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तलाठी कार्यालय हाकेच्या अंतरावर असताना अवैध मुरूम घालतेवेळी महसूल विभागाची यंत्रणा मूग गिळून बसली होती. धनेगाव, सोनेगाव शिवारात खनन माफियांनी महसूल व वन विभागाच्या जागेतच खोदकाम सुरू केले आहे. मुरुमाचे ढीग तयार केले आहेत. यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अवैधरित्या मुरुमाचे खोदकाम करण्यात येत आहे. शासकीय कामात या मुरुमाची विल्हेवाट लावण्यात येत आहे.

खनन माफियांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या गावाच्या शिवारात खनन माफियांच्या विरोधात कधी कारवाई झाली नाही. या खनन माफियांनी अनेकांच्या शेतशिवाराची नासधूस केली आहे.

हरदोली गावात वन विभागाच्या जागेत थेट खोदकाम करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांच्या मुरुमाची विक्री करण्यात आली आहे. यात महसूल विभागाच्या तिजोरीत चुना लावण्यात आला आहे. परंतु यंत्रणा गंभीर होताना दिसून येत नाही. मुरली, सोंड्या गावांच्या शिवारात अवैध खदान सुरू करण्यात आले आहे. दगड फोडण्याचा बेकायदेशीर कारभार सुरू आहे. वन व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याना चिरीमिरी देऊन गिट्टी व मुरुमाचा विक्री करण्यात येत आहे. सिहोरा परिसरात गिट्टी, मुरूम, रेती, विटांचे अवैध व्यवसाय सुरू आहेत.

Web Title: Illegal excavation of Muruma in Dhanegaon Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.