मुली नसतील तर समाज घडणार नाही

By Admin | Updated: December 11, 2014 23:02 IST2014-12-11T23:02:32+5:302014-12-11T23:02:32+5:30

मुली नसतील तर समाज घडणार नाही. मुली याच समाजाच्या जननी आहेत. त्यासाठी मुलींनी शिक्षण घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जीवनातील अडचणीतून मार्ग काढण्यास शिक्षण हे उपयोगी ठरत असते.

If not girls, then society will not happen | मुली नसतील तर समाज घडणार नाही

मुली नसतील तर समाज घडणार नाही

भंडारा : मुली नसतील तर समाज घडणार नाही. मुली याच समाजाच्या जननी आहेत. त्यासाठी मुलींनी शिक्षण घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जीवनातील अडचणीतून मार्ग काढण्यास शिक्षण हे उपयोगी ठरत असते. म्हणून मुलीनी जास्तीत जास्त शिक्षणाच्या दृष्टीने पाऊल ठेवून समोर जाण्याचा प्रयत्न करावा असे मत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.जी. राठोड यांनी व्यक्त केले.
भारत सरकारच्या माहिती व प्रसार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार निर्देशालयाच्या वतीने ४ दिवसीय विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन भंडारा तालुक्यातील बेला, कारधा, टवेपार आणि सिल्ली येथे १२ डिसेंबर पर्यंत करण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून कारधा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पी.जी. बोलत होते. यावेळी अग्रणी बँकेचे प्रबंधक संजय पाठक, इलाहाबाद बँकेचे प्रबंधक संतोष तायडे, जि.प. पाणी व स्वच्छता विभागाचे आय. ई.सी. एक्सपर्ट राजेश्वर येरणे, महिला व बाल कल्याण विभागाचे संजय मेंढे, प्राचार्य हलमारे, मुख्याध्यापक अशोक वैद्य उपस्थित होते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड म्हणाले, मुलींच्या जन्माचे स्वागत करुन समाजात मुलींना कायम दुय्यम स्थान देवू नये. त्यासोबत किशोरवयीन मुलींच्या संदर्भात बोलतांना मुलींच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता राहू नये, म्हणून लोहयुक्त गोळ्या देण्यात येतात. परंतु बऱ्याच मुली या गोळ्या खाण्याचे टाळतात. त्यासाठी शिक्षकांनी मुलींना गोळया नियमित घेण्याचा आग्रह करावा, असेही ते म्हणाले.
इलाहाबाद बँकचे प्रबंधक संतोष तायडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून प्रसार माध्यमाद्वारे जन-धन योजनेची माहिती मिळाल्यास जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा घेता येईल. जन-धन योजनेचे महत्व पटवून देतांना १ लाखाचा अपघात विमा, ३० हजार रुपयांचा जीवन विमा, रुपये कार्ड याबाबत सांगून कर्ज सुविधेच्या संदर्भात सुध्दा मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांनी आपल्या बँकेच्या वतीने कारधा येथे शिबिर लावले होते. या शिबिरात २० लोकांनी अर्ज सादर केले व योजनेचा लाभ घेतला. राजेश्वर येरणे यांनी स्वच्छ भारत अभियानाबाबत माहिती देऊन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. गावकऱ्यांनी मागदर्शन करुन ग्रामस्वच्छतेच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच गावात घरोघरी शौच्छालये बांधण्याबाबत प्रोत्साहित करुन त्यापासून मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली. कारध्याचे सरपंच शितल करंडे यांनी या अभियानाची प्रशंसा केली व शासनाद्वारे योजनांचा जनतेनी लाभ घेण्याकरिता पुढाकारांनी समोर यावे तरच गावाचा विकास होऊ शकेल, असे आवाहन केले.
प्रश्न मंजुषा प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले. या प्रश्न मंजुषा कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. गावामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने युआयडी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात आधार कार्ड धारकांची नोंदणी ५० ग्रामस्थांनी केली. प्रास्ताविक बी.पी. रामटेके यांनी अभियानाचे महत्व सांगून फिल्मोत्सवाअंतर्गत बेला व कारधा येथे आज रात्री माहितीपट व चित्रपट दाखविण्यात येणार आहे त्याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
प्रारंभी ग्रामस्वच्छता रॅलीचा शुभारंभ सरपंच शितल करंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. या रॅलीत प्रकाश विद्यालय, काळे कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, ग्रामस्थ यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी ग्रामस्वच्छतेची शपथ उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन भालचंद्र रामटेके यांनी केले. या कार्यक्रमास क्षेत्रीय प्रचार कार्यालय भारत सरकार वर्धाचे संजय तिवारी, चंद्रपूरचे रामचंद्र सोनसल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: If not girls, then society will not happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.