माहिती अभियान कार्यशाळा : सहायक आयुक्त यांचे प्रतिपादनभंडारा : जनतेने आपल्याला गावाच्या विकासाचे काम करण्यासाठी निवडून दिले आहे. ज्या पदावर आपण विराजमान होतो. त्या पदाचे अधिकार, कर्तव्ये, नियम समजून घेतले पाहिजेत. आपण प्रामाणिकपणे काम केले तर, सरपंच आणि सचिव मिळून गावाला विकासाच्या वाटेवर नेऊ शकतात, असे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त देवसूदन धारगावे यांनी केले.पवनी पंचायत समितीच्या सभागृहात सरपंच, सचिव आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद लोकप्रतिनिधींसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आणि गट विकास अधिकारी पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती अर्चना वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, प्रा. अनिल काणेकर, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे डी.के. रंगारी, पंचायत समिती सदस्य तोमेश्वर, तुळशीदास कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य मनोरथा जांभुळे, गट विकास अधिकारी बी.वाय. निमसरकार उपस्थित होते.धारगावे म्हणाले, अजुनही आपल्या समाजात जातीच्या भिंती आहेत. त्यामुळे एक समाज दुसऱ्या समाजाला कमी लेखतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी ही जातीव्यवस्था नष्ट करण्याचे प्रयत्न केले. शासनही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवित आहे. त्याची माहिती धारगावे यांनी दिली.सभापती अर्चना वैद्य यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना करुन दिली. बाबासाहेबांनी शिका आणि संघटित होण्याचा मंत्र दिला. त्यांनी दलितांनी शिक्षण घेतलेच पाहिजे, असा आग्रह धरला. त्यांच्या प्रेरणेने आज समाज मोठया प्रमाणात शिक्षणाच्या प्रवाहात आला आहे. मनीषा सावळे म्हणाल्या, सरपंच आणि ग्रामसेवकांनी योजनांची माहिती जनतेला दिली पाहिजे. त्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली पुस्तिका सर्व उपस्थितांना देण्यात आली. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, बाळासाहेब ठाकरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी आॅटो परवाना देणारी योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, यु.पी.एस.सी.साठी शिष्यवृत्ती अशा अनेक नवीन योजनांची माहिती दिली. यावेळी प्रा. अनिल काणेकर यांनी भारताचे संविधानातील विविध कलमांची माहिती आणि त्यामागचा इतिहास समजावून सांगितला. तसेच डी.के. रंगारी यांनी विविध प्रयोगांच्या माध्यमातून जादुटोणाविरोधी कायदयातील १२ कलमांची माहिती दिली. तसेच या कलमांच्या अंतर्गत होणारी शिक्षा व दंड याची जाणीव सरपंच ग्रामसेवकांना यावेळी करुन दिली.कार्यशाळेचे संचालन विस्तार अधिकारी एस.बी. साळवे यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी बी.वाय. निमसरकार यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेला पवनी तालुक्यातील १८५ ग्रामसेवक, सरपंचांची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)
प्रामाणिक कार्य केल्यास गाव विकास शक्य
By admin | Updated: May 21, 2016 00:35 IST