मने बदलली.. अन् मतेही..!
By Admin | Updated: October 20, 2014 23:07 IST2014-10-20T23:07:28+5:302014-10-20T23:07:28+5:30
राज्यातील आघाडी शासनाने केलेली कामे, राबविलेल्या योजना कल्याणकारी असल्या तरी या योजनांपेक्षाही आघाडी सरकारच्या काळात झालेले घोटाळे, भ्रष्टाचाराचा कहर यामुळे सामान्य नागरिकांमध्ये

मने बदलली.. अन् मतेही..!
भंडारा : राज्यातील आघाडी शासनाने केलेली कामे, राबविलेल्या योजना कल्याणकारी असल्या तरी या योजनांपेक्षाही आघाडी सरकारच्या काळात झालेले घोटाळे, भ्रष्टाचाराचा कहर यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. हा असंतोष संघटीत करण्याचे काम भाजपने केले. सोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती प्रचार संपूर्ण राज्य ढवळून निघाला. वारूळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तशा स्वरूपात ईव्हीएममधून मते बाहेर पडली.
ही सारी किमया एका दिवसात झालेली नाही. लोकसभेतील पराभवानंतर लोकांची मने जुळविण्याचे काम व्हायला पाहिजे होते, तसे झाले नाही. उलट आघाडी शासनाविरुद्ध लोकांच्या मनामध्ये असंतोष उफाळू लागला. उलट मोदी यांच्या कामांची चर्चा होऊ लागली. बदललेल्या मनांवर जात-पात या विचारधारांचा प्रभाव पडला नाही. परंतु मने बदलली आणि मते बनली, मते ठाम राहिली व चमत्कार घडला यातून भंडारा जिल्हाही सुटला नाही.
भंडारा जिल्ह्यात भाजपने मिळविलेल्या मताधिक्याचा विजय हा केवळ अशा बदललेल्या मनांचा परिणाम आहे. ही मने फक्त उमेदवारांसाठी निश्चितच बदलली नाहीत तर परिवर्तनासाठी झालेले हे मन परिवर्तन आहे, हे आता सर्वच मान्य करीत आहेत.
यावेळी सर्वच पक्ष स्वतंत्ररित्या लढूनही मुस्लिम आणि दलित मतांची मोट काँग्रेस व राष्ट्रवादीला बांधता आली नाही. उलट आघाडी शासनाचा भ्रष्टाचार भाजपने जनतेला पटवून देऊन सारेच मोदी लाटेवर तरले. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावूनही ‘घडी’ नीट बसली नाही, अस्तित्वाच्या लढाईत काँग्रेस श्रेष्ठीनेही ‘हाथ’ झटकले.
भंडारा जिल्ह्यात त्या-त्या विधानसभा क्षेत्रात समाजनिहाय एकजूट झाली, परंतु एकाच समाजातून अधिक उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतांचे विभाजन झाले, हे एकदाचे मान्य करता येईल. परंतु विजयी उमेदवारांना मिळालेले मताधिक्य हे केवळ एकाच समाजाच्या एकजुटीचे नव्हते, हेसुद्धा या निकालावरुन मान्य करावेच लागणार आहे.
या निवडणुकीत ‘मोदी’ लाट होती, हे निकालच सांगतात, मात्र या लाटेमागील कार्यकारणभाव लक्षात घेणे गरजेचे आहे. मतदार जागृत झाले आहेत. आता त्यांना गृहीत धरता येणार नाही. आज ते तुमच्यासोबत असले तरी ईव्हीएमपर्यंत त्यांची मते बदलू शकतात, हे विसरता येणार नाही. लोक बोलत नाहीत तर करून दाखवितात, याचे प्रत्यंतर यानिमित्ताने समोर आले आहे. या निवडणुकीत हवा निर्माण करणाऱ्यांना मतदारांनी सपेशल नाकारले.
भंडारा विधानसभा क्षेत्रात शिवसेना सोशल मिडीयावर दिसली. परंतु ते मात्र ‘सोशल’ झाले नाहीत. लोकांना आता सत्य समजते, उमजते व ते प्रगटही होते, हे निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता ‘पब्लिक फर्स्ट’ हेच लक्षात ठेवणे आवश्यक आहे, यात शंका नाही. हा निकाल म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना ‘ठेच’ आहे. आता ती लागली. पुढे शहाणा कोण होतो, यावरच सारे काही अवलंबून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)