‘ती’ शिकारी टोळी गजाआड
By Admin | Updated: August 9, 2016 00:28 IST2016-08-09T00:28:44+5:302016-08-09T00:28:44+5:30
तुमसर तालुक्यातील पांगळी बीट अंतर्गत राखीव कक्षात वीज प्रवाहाने वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होता.

‘ती’ शिकारी टोळी गजाआड
नाकाडोंगरी वनविभागाची कारवाई : पांगळी राखीव कक्षात वीज प्रवाह सोडून वन्यप्राण्यांची शिकार प्रकरण
तुमसर : तुमसर तालुक्यातील पांगळी बीट अंतर्गत राखीव कक्षात वीज प्रवाहाने वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होता. तुमसर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यापैकी दोन आरोेपींना नागपूर येथे सापळा रचून अटक करण्यात आली.
देवचंद हरिचंद मडावी (६०), टेकचंद लटारू राहांगडाले (४०) व संजय टेकचंद राहांगडाले (१९) सर्व राहणार गर्रा बघेडा अशी आरोपींची नावे आहेत.
पांगळी बीट अंतर्गत राखीव जंगलातील कक्ष क्रमांक ५५ मध्ये वीज प्रवाह सोडून वन्यप्राण्यांची शिकार करण्यात येत असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांना मिळाली. वनपथकाने देवचंद हरिचंद मडावी रा. बघेडा याला रंगेहाथ अटक करण्यात आली. तर इतर दोन आरोपी टेकचंद राहांगडाले व त्याचा मुलगा संजय हे दोघेही फरार झाले.
दोन्ही आरोपी नागपूर येथे नातेवाईकांकडे वास्तव्याला आहेत. अशी माहिती वनअधिकाऱ्यांना मिळाली. आरोपी मागावर एक वनपथक नागपूर येथे रवाना झाले. नागपूर येथे सापळा रचून दोन्ही आरोपींना वनपथकाने जेरबंद केले. वन्यजीव संरक्षक कायद्यानुसार ९,३९,५१,५२ व भारतीय वनअधिनियम १९५७ चे कलम २६ (१) अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना १० आॅगस्टपर्यंत वनकोठडी सुनाविण्यात आली.
ही कारवाई नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी एम. एन. माकडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक आर. आर. परतेती, धुर्वे, वनरक्षक वैभव ओगले, जे. डी. हटवार, ए. बी. मेश्राम, हेमराज सिरसाम, कवळू राहांगडाले यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)