सिंदपुरीत शेकडो संसार उघड्यावर
By Admin | Updated: August 5, 2014 23:19 IST2014-08-05T23:19:38+5:302014-08-05T23:19:38+5:30
मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसादरम्यान सिंदपुरी या गावातील माजी मालगुजारी तलावाची पाळ फुटली. पाणी दुसऱ्या बाजूने वाहून जाण्यासाठी तलावाची पाळ फोडण्यात आली.

सिंदपुरीत शेकडो संसार उघड्यावर
आजही भयावह स्थिती : मदतीसाठी ग्रामस्थांची याचना सुरूच, सेवाभावी संस्थाकडून धान्याची झाली मदत
भंडारा : मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसादरम्यान सिंदपुरी या गावातील माजी मालगुजारी तलावाची पाळ फुटली. पाणी दुसऱ्या बाजूने वाहून जाण्यासाठी तलावाची पाळ फोडण्यात आली. अन्यथा संपूर्ण गावच वाहून गेले असते. या पाण्याचा फटका २,०९७ लोकसंख्येच्या या गावाला बसला. ३९१ कुटुंबसंख्येच्या या गावातील सुमारे ६० ते ६५ घरे पुर्णत: कोसळली असून १७० च्यावर घरांना क्षति पोहोचली आहे. त्यामुळे हे ग्रामस्थ सद्यस्थितीत गावातील समाज मंदिरात आश्रयाला आहेत. काल, या गावाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी भेट दिली असता बेघर झालेल्या कुटुंबांनी ‘घर पाहिजे घर’ असा एकच टाहो होता.
तुमसर तालुक्यात दक्षिणेला सिंदपुरी, उत्तरेला चांदपूर, पूर्वेला गोंदेखाली आणि पश्चिमेला मांगली आहे. उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा असल्यामुळे वरचा पाऊस थेट सिंदपुरी तलावात जमा होतो. सिंदपुरी गावाच्या हद्दीत सुमारे १३५ एकर जागेत माजी मालगुजारी तलाव आहे. यात ३६ एकर जागेची मालकी खेमराज हेडाऊ यांची आहे. या तलावातील पाण्याचा परिसरातील चार गावातील शेतकऱ्यांना लाभ होतो. या तलावाच्या पाळी जीर्ण झालेल्या आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात तलावाची पाळ फुटण्याची सुचना गावकऱ्यांनी उन्हाळ्यातच प्रशासनाला दिली होती. परंतु या तलावाची दुरूस्ती करण्यात आली नाही. आणि जे व्हायचे नव्हते तसे घडले. तलावाची पाळ फुटली. या पाण्याचा लोंढा गावात शिरला. त्यानंतर एकच धावपळ सुरू झाली. घरातील अन्नधान्य वाहून गेले. कंबरेइतक्या पाण्यातून लोकांनी मार्ग काढला आणि हे कुटूंब उंचावर असलेल्या विष्णु मंदिर, हनुमान मंदिर, शाळेत आश्रयाला आले.
मंदिर झाले घर
सद्यस्थितीत विष्णु मंदिरात २२ ते २५ कुटूंब आहेत. ५ ते ६ कुटूंब हनुमान मंदिरात राहत आहेत. विष्णु मंदिरात वास्तव्याला असलेल्या सुर्याबाई बेनीबागडे, सुमन करंडे, कौतुका निखाडे म्हणाल्या, एकीकडे आमचे घरच पुर्णत: पडले असताना तहसीलदार २,५०० व ३,००० रुपयांचे चेक देत आहे. घरच पडले तर एवढीशी रक्कम घेऊन काय करायचे असा सवाल करून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. आम्ही हातावर आणून पानावर खाणारे, आता राहायचे घरच पाण्याच्या लोंढायाने पडले. आता आम्ही बेघर झालो, तुम्हीच सांगा आता राहायचे कुठे? असा त्या माऊलींचा प्रश्न होता. त्यानंतर हनुमान मंदिरात भेट दिली असता तिथल्या कुटूंबांनीही आता आमचे राहायचे घर पडले घराशिवाय आम्ही राहायचे कुठे? हा प्रश्न संत्रस्त करणारा होता.
तलाठ्याविरुद्ध रोष
गावात ६० ते ७० कुटुंबाचे घरे जमिनदोस्त झालेली असताना तलाठ्याने आमच्या घराचे पंचनामे केले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. खावटी देण्यात आली आता मदत मिळणार नाही, असे त्यांचे म्हणने होते. ज्यांचे नुकसान झाले, त्यांची नावे मदतीच्या यादीत समाविष्ट न करता अन्य लोकांची नावे समाविष्ट केल्याचा त्यांचा आरोप होता. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत मिळाली पाहिजे, असेही या ग्रामस्थांचे म्हणने होते.
समयसुचकता ठरली लाखमोलाची
तलावाची पाळ फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन सभापती कलाम शेख यांनी तलावाच्या दुसऱ्या बाजुला असलेल्या पाळीला फोडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गावातील भय्यालाल वैद्य, निखिल सिंगनजुडे, सुनिल चौधरी, धनपाल वैद्य यांच्या मदतीने पाळ फोडली. त्यामुळे गावात येणारा पाण्याचा लोंढा काही प्रमाणात कमी झाला. शेख यांच्या समयसुचकतेमुळे अनर्थ टळला अन्यथा गाव वाहून गेले असते...