स्वातंत्र्य संग्राम सैनिकाला अपमानास्पद वागणूक
By Admin | Updated: January 20, 2016 00:48 IST2016-01-20T00:48:31+5:302016-01-20T00:48:31+5:30
स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या व्यथा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेल्या एका ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिकाला ..

स्वातंत्र्य संग्राम सैनिकाला अपमानास्पद वागणूक
नागलवाडे यांनी मांडली कैफियत : पटोलेंनी केली चौकशीची मागणी
भंडारा : स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या व्यथा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेल्या एका ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिकाला जिल्हाधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार सोमवारला दुपारी उघडकीस आला. त्यानंतर हा प्रकार त्यांनी लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिल्यानंतर ‘लोकमत’ कार्यालय गाठले.
शत्रुघ्न नागलवाडे रा.कनेरी असे या ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचे नाव आहे. जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक सोमाजी बोकडे रा.सानगडी यांचे निधन झाल्यामुळे नवीन अध्यक्ष निवडीची सभा बोलाविण्यासंदर्भात चर्चा करणे आणि स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या समस्या घेऊन नागलवाडे हे सोमवारला दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना भेटण्यासाठी गेले होते.
या भेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी नागलवाडे यांना तुम्ही या जिल्ह्याचे नाहीत. बाहेर जा, असे सांगून परत पाठविले.
यापूर्वी भंडारा जिल्ह्यातील एकाही जिल्हाधिकाऱ्यांकडून आपल्याला अशा प्रकारचा अनुभव आला नसल्याचे सांगत नागलवाडे म्हणाले, जिल्हा गौरव समितीचा मी काही वर्षे अध्यक्ष होतो. तेव्हापासून स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या समस्या मांडत आहे. आता जिल्ह्यात आम्ही सात स्वातंत्र्य संग्राम सैनिक असून सोमाजी बोकडे यांचे अलिकडेच निधन झाले. धनपत रहागंडाले रा.येरली आणि मिताराम पाटील रा.मोहाडी हे अंथरूणाला खिळले आहेत. याशिवाय विश्वनाथ भाजीपाले रा.तुमसर, भिवाजी अंबुले रा.चुल्हाड, सत्तारभाई तुरक रा.पोहरा, गरीबा जनबंधू रा.रानपौना हे सुद्धा वयोवृद्ध आहेत. त्यामुळे मी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या समस्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. स्वातंत्र्य संग्राम सैनिकाशी जिल्हाधिकारी सौजन्याने वागत नसेल तर सामान्य जनतेशी कसे वागत असतील, असा आरोपही नागलवाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
(जिल्हा प्रतिनिधी)