मानवतेचा परिचय देणारा पुरस्कार
By Admin | Updated: September 16, 2016 01:21 IST2016-09-16T01:21:36+5:302016-09-16T01:21:36+5:30
भंडारा जिल्हा हा नवरत्नाची खाण आहे़ गुलाम गौस यांच्यासारख्या समाजसेवाकाला या पुरस्काराने

मानवतेचा परिचय देणारा पुरस्कार
नाना पटोले : गुलाम गौस भंडारा भूषण पुरस्कारने सन्मानित
भंडारा : भंडारा जिल्हा हा नवरत्नाची खाण आहे़ गुलाम गौस यांच्यासारख्या समाजसेवाकाला या पुरस्काराने सन्मानित करून भंडाराचा राजा या प्रतिष्ठानाने जात धर्माच्या पलिकडे जाऊन मानवतेच्या परिचय करून दिला आहे़ भंडारा जिल्ह्याला मागासलेला जिल्हा संबोधला जातो. यासाठी सामाजिक स्तरावरून मागासलेपणाचा हा कलंक पुसून काढण्याचे काम भंडारा राजा या गणेशोत्सव मंडळाकडून होत आहे. हा पुरस्कार मानवतेचा परिचय देणारा असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
भंडाराचा राजा या प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, उद्योगपती सुनिल मेंढे, मुकेश थानथराटे, भाजपचे महामंत्री भरत खंडाईत, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बागडे उपस्थित होते.
भंडाऱ्याचा राजा प्रतिष्ठानतर्फे मागीलवर्षीपासून देण्यात येणारा मानाचा भंडारा जिल्हा भुषण पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी तुमसर तालुक्यातील ७० वर्षीय गुलाम गौस मोहम्मद ईस्माईल यांना देण्यात आला. खासदार नाना पटोले यांच्या हस्ते ११ हजार रोख सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौस यांना गौरविण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जोपासत असताना प्रतिभावंत प्रसिध्दीपासून दूर असतात, मात्र त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरतात, अशा प्रतिभावंताना या मंडळाने शोधल्याचे सांगून भंडाराचा राजा या गणेश मंडळाचे खा.पटोले यांनी कौतुक केले. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष बाबूराव बागडे, सुनिल मेंढे यांनी मार्गदर्शन करताना गणेश मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सत्कारमूर्ती गौस यांचा परिचय चेतन भैरम यांनी करून दिला. यावेळी मंडळाचे संयोजक मंगेश वंजारी, नगरसेवक विकास मदनकर, दीपक वंजारी, यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)