कसं जायचं पुण्याला परीक्षेला!

By Admin | Updated: February 21, 2016 00:20 IST2016-02-21T00:20:03+5:302016-02-21T00:20:03+5:30

केंद्रीय रेल्वे बोर्डाने मागील महिन्यात ड वर्गाच्या पदासाठी जाहिरात प्रकाशित केली.

How to test Pune! | कसं जायचं पुण्याला परीक्षेला!

कसं जायचं पुण्याला परीक्षेला!

प्रश्न पडला अंधांना : रेल्वेचा अजब कारभार, परीक्षा केंद्र पुण्यात
खराशी : केंद्रीय रेल्वे बोर्डाने मागील महिन्यात ड वर्गाच्या पदासाठी जाहिरात प्रकाशित केली. या परीक्षेचे प्रवेशपत्र रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून अंध उमेदवारांना परीक्षा केंद्र पुणे या शहरात दिले. यामुळे अनेकांना धक्का बसला असून परीक्षा द्यायला जायचे कसे, असा प्रश्न पडला आहे.
अंध उमेदवारांनी रेल्वेच्या ड वर्गाच्या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना नागपूर येथील परीक्षा केंद्राला पहिली पसंती दिली होती. मात्र, रेल्वे विभागाने प्रसिध्द केलेल्या प्रवेशपत्रात पुणे येथे ही परीक्षा होणार असल्याचे आता जाहीर केले आहे. त्यामुळे पुणे येथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने अंध उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अंध उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी सहायक घेण्याची मुभा आहे. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी त्यांनी नेमलेल्या सहायकाला परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्याची जिम्मेदारी त्यांचीच आहे. पुणे येथे परीक्षा केंद्र असल्याने जाणे-येण्याचा प्रवास, निवास, खाण्यापिण्याची सुविधा करणे खर्चाची बाब आहे. एका उमेदवाराला दोन ते चार हजाराचा खर्च आता या उमेदवारांना सहन करावा लागणार आहे. तर अनेक अंध परीक्षार्थी पुणे येथे जाऊ शकत नसल्याने त्यांना परिक्षेपासून वंचित रहावे लागणार आहे.
अंध उमेदवारांनी नागपुर परीक्षा केंद्र नमूद केले असताना, त्यांना पुणे येथे परीक्षा केंद्र देण्याचा अजब प्रताप रेल्वे विभागाने का केला असावा असा प्रश्न आहे. तर पुणे - मुंबई येथील परीक्षार्थ्यांना नागपूर येथे परीक्षा केंद्र देण्यात आले. त्यामुळे रेल्वे प्रशासन या अंध परिक्षार्थ्यांची थट्टा करीत असल्याचे बोलले जाते.
या संबंधाने नॅशनल असोशिएसन फॉर द ब्लांइड या संघटनेने पाठपुरावा केला. मात्र आता परीक्षा केंद्रात बदल होण्याची शक्यता कमी आहे. घराबाहेर पडतांना ज्या अंधांना दहा वेळा विचार करावा लागतो त्यांना नागपूर ऐवजी पुणे येथे परीक्षा केंद्र देऊन रेल्वे विभागाने काय साध्य केले हे अनुत्तरीत असुन अनेक अंध उमेदवार या निमित्ताने शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करीत आहेत. तर काही उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: How to test Pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.