रेतीच्या राजरोस वाहतुकीचे आणखी किती बळी?

By Admin | Updated: May 9, 2017 00:19 IST2017-05-09T00:19:42+5:302017-05-09T00:19:42+5:30

जिल्ह्यात रेतीची अवैध वाहतूक थांबता थांबत नसल्याचे चित्र दररोज दिसत असून....

How many more victims of the road traffic? | रेतीच्या राजरोस वाहतुकीचे आणखी किती बळी?

रेतीच्या राजरोस वाहतुकीचे आणखी किती बळी?

प्रशासन केव्हा जागे होणार : दोन दिवसांत दोघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात रेतीची अवैध वाहतूक थांबता थांबत नसल्याचे चित्र दररोज दिसत असून रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टरच्या धडकेत दररोज लहानमोठे अपघात होत आहेत. शनिवार व रविवार असे सलग दोन दिवशी रेती वाहतुकीच्या टिप्परने दोन जणांना बळी घेतला आहे. दररोज जीव जात असताना जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाचे या अवैध रेती वाहतुकीकडे लक्ष जाणार की नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
भंडारा जिल्ह्यात ५३ रेती घाटांपैकी २७ रेतीघाटांचे लिलाव झाले आहेत. तांत्रिक कारणांमुळे काही रेतीघाटांचे लिलाव झालेले नाहीत. लिलाव न झालेल्या काही घाटांतून रेतीची तस्करी सुरू आहे. ज्या घाटांचे लिलाव झाले आहेत, तिथून रेतीचा रात्रंदिवस उपसा सुरू आहे. परंतु या रेती घाटांच्या अवैध वाहतुकीला लगाम लावण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याने याचा फटका सामान्य जीवाला बसत आहे. मागील दोन दिवसात रेती वाहतुकीमुळे निष्पाप दोन जीवांचा बळी गेला. अवैध वाहतुकीमुळे आणखी किती जणांचा बळी जाईल? प्रशासनाला केव्हा जाग येईल? हा प्रश्न सामान्यजणांना पडला आहे.
शनिवारला दुपारी पवनी-लाखांदूर मार्गावरील विरली येथे भरधाव टिप्परच्या धडकेत सुनिता रमेश महावाडे या ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. चार वर्षापुर्वी तिच्या पतीचे निधन झाले आता तिची मुले पोरकी झाली आहेत. घटनेच्या दिवशी ती शेतातून गवताचा भारा आणत असताना काळाने तिच्यावर झडप घातली. त्यानंतर रविवारला दुपारी एका लग्न समारंभातून गावाकडे परतत असताना रेती वाहून नेणाऱ्या भरधाव वाहनाने लाखांदूर पंचायत समितीचे माजी सदस्य देवीदास भोयर यांना धडक दिली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

जीवघेणी वाहतूक
रेतीची वाहतूक करणारी वाहने बेधडकपणे रस्त्यावरून धावत आहेत. परिणामी अपघाताची संख्या बळावली आहे. विरली व अड्याळ मार्गावर घडलेल्या या दोन्ही घटनेतील वाहने ही रेतीची वाहतूक करणारी होती. देवीदास भोयर यांच्या अपघाताचे दृश्य मन हेलावणारे होते. संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला. वाहनचालक सापडला असता तर अनर्थ घडला असता. ज्या गावाच्या हद्दीतून रेतीची वाहतूक होत आहे. त्या गावातील नागरिकांची समिती गठीत त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्याची गरज आहे. जिल्हा खनीकर्म विभागाला यावर्षी गौण खनिजांच्या माध्यमातून ५४ कोटी ११ लाखांचा महसूल मिळत असला तरी अवैध खनिजांच्या वाहतुकीमुळे बळी गेलेल्यांचा जीव अमूल्य आहे, हे प्रशासनाला सांगणार तरी कोण?

Web Title: How many more victims of the road traffic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.