संरक्षण भिंतीमुळे ती जागा पूरबाधित कशी?

By Admin | Updated: March 5, 2016 00:39 IST2016-03-05T00:39:32+5:302016-03-05T00:39:32+5:30

जमिनींचे भाव गगनाला भिडलेले असताना जलशुद्धीकरण केंद्रालगतची दीड एकर जमीन केवळ एक लाख रूपयांमध्ये .....

How to flood the ground due to the protection walls? | संरक्षण भिंतीमुळे ती जागा पूरबाधित कशी?

संरक्षण भिंतीमुळे ती जागा पूरबाधित कशी?

महिला रूग्णालयाला नाकारण्यात आलेली जागा मार्केट यार्डला
भंडारा : जमिनींचे भाव गगनाला भिडलेले असताना जलशुद्धीकरण केंद्रालगतची दीड एकर जमीन केवळ एक लाख रूपयांमध्ये भंडारा पालिकेने ३० वर्षांकरीता लीजवर दिली. ही जागा पहिल्यांदा महिला रुग्णालयासाठी मागण्यात आली होती. परंतु ही जागा पूरबाधित क्षेत्रात येत असल्याची कारणे सांगून हा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. असे असताना मार्केट यार्डसाठी ही जमीन कशी काय देता येऊ शकते? असा प्रश्न करून भंडारा शहरात पुराचे पाणी येऊ नये यासाठी कोट्यवधी रूपये खर्चून संरक्षक भिंत बांधण्यात आली, त्यामुळे या भागात पुराचा धोका संभवण्याची स्थिती नाही. त्यामुळे ही जागा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घ्यावी, असा सूर ‘लोकमत’च्या चर्चासत्रातून निघाला.
पूरबाधित जागा ताब्यात घ्या, अशी शहरात मागणी सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सामाजिक कार्यकर्ते डॉ.सीमा तुरस्कर, डॉ.नीतीन तुरस्कर, भाजपचे नगरसेवक महेंद्र निंबार्ते, नगरसेवक विकास मदनकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल गायधने, भाजप अल्पसंख्यक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आबिद सिद्धीकी, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते हर्षल मेश्राम, बजरंग दलाचे प्रविण उदापुरे, बजरंग दलाचे पन्ना सार्वे आदी सहभागी झाले होते.
महिला रुग्णालयाची गरज
यावेळी प्रविण उदापुरे म्हणाले, जलशुद्धीकरण केंद्रालगतची दीड एकर जागा ‘रेड झोन’ मध्ये असल्याचे कारण प्रशासनाने सांगून या जागेबाबतचा प्रस्ताव नाकारण्यात आला. आता मात्र ही जागा मार्केटयार्डसाठी देण्यात आली. ही जागा रेड झोनमध्ये असतानाही वैनगंगा नदीचे बॅकवॉटर शहरात शिरू नये, यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात आली. अर्थात भविष्यात ‘रेड झोन’ची जागा ‘ब्ल्यु झोन’मध्ये परावर्तीत करण्याची संधी आहे. ही बाब कायदेशिररित्या योग्य असेल तर मग ही जागा महिला रुग्णालयासाठी नाकारणे आणि खासगीरित्या देणे हे दुर्देवी आहे.
संपूर्ण प्रक्रियाच चुकीची
अनिल गायधने म्हणाले, संबंधित जागा म्हाडा व बगिच्यासाठी राखीव असताना या जागेच्या निर्णयासंदर्भात नागपूर विभागीय कार्यालयातूनच निर्णयप्राप्त झाल्यावरच कारवाई करण्याचे आदेश आहे. मात्र या जमिनीबाबत कुठलीही कारवाई न करता स्वार्थाच्या राजकारणात ही जमीन एक लक्ष रूपयात लीजवर देण्यात आली. नगरपालिकेची ही संपूर्ण प्रक्रिया चुकीची आहे. या जागेवर महिला रुग्णालय नको म्हणून ती जागा रेड झोनमध्ये असल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्यांचा फायदा असे दृष्टीक्षेपात ठेवून कोट्यवधी रूपयांची ही जागा कवडीमोल भावात लीजवर देण्यात आली. या भाजीपाला मार्केटमध्ये केवळ मोठ्या व्यापाऱ्यांचे हित जोपासले जाणार असून शेतकरी व लहान भाजीविके्रते विनाकारण भरडले जातील.
१५६ कोटींचा खर्च व्यर्थ
महेंद्र निंबार्ते म्हणाले, शहरातील जागा बळकाविण्याचा प्रकार भुखंड माफियांनी राजरोसपणे सुरू केला आहे. शहराच्या सभोवताल सुरक्षा भिंत बांधून शहराला सुरक्षित करण्यात आले. यासाठी आतापर्यंत १५६ कोटी रूपयांची उधळपट्टी करण्यात आली. संबंधित जागेवर महिला व बाल रुग्णालय उभारले जावू शकते. मात्र वैयक्तीक फायद्यासाठी पालिका प्रशासनाने भाजीपाला मार्केट उभारण्याचा निर्णय घेतला. हास्यास्पद म्हणजे या मार्केटमधून वर्षाकाठी केवळ २० हजार रूपयांचा महसूल पालिकेला मिळणार आहे. रेड झोनचा विषय ग्राह्य धरल्यास संरक्षण भिंतीचा उपयोग तरी काय, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. विकासाचा ब्ल्यु प्रिंट व भविष्यातील नियोजनाच्या अभावामुळे वैयक्तीक राजकारण फोफावले आहे.
ब्ल्यू प्रिंट नाही
डॉ. नितीन तुरस्कर म्हणाले, वैनगंगा नदीचे बॅक वॉटर शहरात येऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात आली तरीही रेड झोनचा मुद्दा निकाली निघाला नाही. मानवी आरोग्याशी निगडीत असलेल्या महिला रुग्णालयाच्या इमारतीसाठी जलशुद्धीकरण केंद्राजवळची जागा देण्यात आली नाही. रेड झोनचे कारण पुढे करून आता राजकारणी मंडळींनी तिच जागा लोभापायी वैयक्तीकरित्या लिजवर दिली आहे. शासन परिपत्रकानुसार, शहराचे टाऊन प्लॅनिंग, नागरिकांची मते आदी जाणून घेणे महत्वाचे आहे. महिला रुग्णालय चांगल्या जागेवर झाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
लहान व्यापाऱ्यांची गळचेपी
आबीद सिद्धीकी, म्हणाले, जलशुद्धीकरणाजवळची जागा कोट्यवधी रूपये किंमतीची आहे. या जागेवर आता भाजीपाला मार्केटसाठी शेड उभारण्याचे काम सुरू आहे. ज्यांना ही जागा लीजवर देण्यात आली आहे. त्याच व्यक्तीकडून संबंधित व्यापारी माल घेतील. यात हितसंबंध असणाऱ्यांनाच या मार्केटमध्ये प्राधान्य दिले जाईल. परिणामी शेतातून थेट मार्केटमध्ये शेतमाल विकण्यासाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची व लहान व्यापाऱ्यांची गळचेपी होईल. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल. शहरात तरी एवढी जागा कमी किमतीत कुठेही उपलब्ध नाही. ज्यांच्याकडे माल खरेदी केली जाईल त्यांनाच या शेडमधील जागा उपलब्ध करून दिल्या जाईल, यात शंका नाही. या चौकशीत व्यक्तीचा विरोध नसून प्रशासनाचा दोष शोधण्याची गरज आहे.
दोषींना निलंबित करा
विकास मदनकर म्हणाले, महिला रुग्णालयाचा प्रस्ताव अमान्य करीत ज्या अधिकाऱ्यांनी मार्केट यार्डसाठी जागेची मंजुरी दिली त्याची चौकशी करण्यात यावी. त्यात दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची गरज आहे. आधीच कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत असताना स्थानिक प्रशासनाने यासंबंधाने मंजुरी दिलीच कशी? हा मुळ प्रश्न आहे. जनतेची दिशाभूल करणारा हा प्रकार असून सत्य बाबी जनतेसमोर येणे गरजेचे आहे.
सिटी सर्वेक्षणची गरज
डॉ. सीमा तुरस्कर म्हणाल्या, शहरात अतिक्रमणाचा मुद्दा जुना आहे तितकाच रेड झोनचा मुद्दाही शहराचा विकासात बाधक ठरला आहे. सन १९५६ ला भंडारा शहराचे सार्वजनिकरित्या सर्व्हेक्षण (सिटी सर्व्हे) झाले होेते. तेव्हापासून आजपर्यंत सर्व्हेक्षण झाले नाही. महिला रुग्णालयासाठी प्रस्तावित जागा ऐनवेळी क्षुल्लकशा लीजवर देण्यात येते. अतिक्रमणात शहरातील तलाव गिळंकृत झाले. प्रशासनाला व नागरिकांना याची जाणीव असली तरी आंधळेपणाने ते बघितले जात आहे. हे अत्यंत दुर्देवी बाब आहे. सिटी सर्व्हेक्षण करून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आहे.
पालकमंत्र्यांचा दावा फोल
पन्ना सार्वे म्हणाले, महिला व बाल रुग्णालयासाठी मागीलवर्षी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी जागा उपलब्ध करून भूमिपूजन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र जागा उपलब्ध झाली नसल्याने पालकमंत्र्यांचा हा दावा फोल ठरला आहे. आंदोलनानंतरही आमची दिशाभूल करण्यात येत आहे. संबंधित जागेवर रुग्णालय होवू शकले असते. मात्र त्यात राजकारण्यांनी शिरकाव केल्याने हा मुद्दा अजुनही सुटलेला नाही.
उभे राहायलाही जागा नाही
हर्षल मेश्राम म्हणाले, सध्याच्या वातावरणामुळे भविष्यात तरी कुठल्याही प्रोजेक्टबाबत जमिन सहजतेने उपलब्ध होईल, असे वाटत नाही. शेतकरी उभे कुठे राहणार, असा जिवंत प्रश्न सर्वांसमोर निश्चितपणे निर्माण होणार आहे. नगरपालिका प्रशासनाने जो निर्णय या जमिनीबाबत घेतला तसा निर्णय कधी मालगुजारांनीही घेतला नाही. स्वार्थाचे राजकारण मुलभूत विकासाला बाधक ठरत आहे.
महिला रुग्णालय हवे
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल आणि जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांना या प्रश्नाबाबत छेडले असता ते म्हणाले, जिल्ह्यात महिला रूग्णालयाची गरज आहे. जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या जागेवर महिला रूग्णालय नाकारण्यात आले. परंतु मार्केटयार्डला ही जागा प्रशासनाने दिली आहे. याची माहिती घेतल्यानंतर भाष्य करणे योग्य राहील. (प्रतिनिधी)

Web Title: How to flood the ground due to the protection walls?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.