अपंग विद्यार्थ्यांनी वर्गखोल्यांत जायचे तरी कसे?

By Admin | Updated: January 29, 2015 23:01 IST2015-01-29T23:01:09+5:302015-01-29T23:01:09+5:30

जिल्ह्यात आज घडीला ६० हून अधिक महाविद्यालये आहेत. यातील अनेक महाविद्यालयांत अपंग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे अपंग

How do students with disabilities go to classrooms? | अपंग विद्यार्थ्यांनी वर्गखोल्यांत जायचे तरी कसे?

अपंग विद्यार्थ्यांनी वर्गखोल्यांत जायचे तरी कसे?

भंडारा : जिल्ह्यात आज घडीला ६० हून अधिक महाविद्यालये आहेत. यातील अनेक महाविद्यालयांत अपंग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे अपंग विद्यार्थ्यांना दररोज परीक्षा द्यावी लागत आहे. ही परीक्षा असते महाविद्यालयांत पोहोचण्याची, लढा असतो वर्गखोल्यांत प्रवेश करण्याचा अन् संघर्ष असतो स्वत:चा आत्मविश्वास ढळू न देण्याचा. महाविद्यालयामध्ये अपंग विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे. शिक्षण मनुष्याला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनविते. परंतु अगोदरच अपंग असलेल्या विद्यार्थ्यांना सुविधांचे पाठबळच नसल्याने त्यांची संधी तर हिरावून घेतल्या जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अपंग विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आरक्षण, शुल्क सवलती, शिष्यवृत्ती अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी प्रवेशदेखील घेतात. परंतु महाविद्यालयांत गेल्यावर मात्र त्यांना पायाभूत सुविधाच नसल्याचे लक्षात येते. पुण्यात एका अपंग विद्यार्थिनीला महाविद्यालयात जाण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे दोन वर्षे ती परीक्षेला बसू शकली नव्हती. परंतु तिने हार न मानता उच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. आता न्यायालयाने सर्व महाविद्यालयांना अपंगासाठी प्राथमिक सुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहे. या निमित्ताने शहरातील विविध महाविद्यालयांची पाहणी केली असता अपंगांना वर्गखोल्यांत जाता येईल, याची व्यवस्था अनेक ठिकाणी नसल्याचे दिसून आले. अपंग विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा पुरवण्याच्या बाबतीत बरीचशी महाविद्यालये असक्षम ठरली आहेत.
भंडारा जिल्ह्यातील मोजक्या महाविद्यालयांत अपंग विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. परंतु काही अपवाद सोडले तर महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या व्हीलचेअरसाठी रँप, वरच्या मजल्यावरील वर्गात जाण्यासाठी लिफ्ट, व्हीलचेअरवरून वापरता येण्याजोगे स्वच्छतागृह अशा मूलभूत सुविधा निर्माण करण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. १९९५ पासून अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम अस्तित्वात असून,वारंवार सूचना, परिपत्रके काढूनही अपंग विद्यार्थ्यांसाठी सुविधाच निर्माण केलेल्या नाहीत व विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घेतली नाही. (नगर प्रतिनिधी)

Web Title: How do students with disabilities go to classrooms?