लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वछता कामगार नियमित पदावर कार्यरत असताना दोन महिन्यापूर्वी बी. एस. ए. कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे संस्थेमार्फत नव्याने ३३ स्वछता कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता कामगार भरतीत अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वछता कामगार नियुक्त असतानासुद्धा अतिरिक्त स्वछता कामगारांची नियुक्ती केली आहे. एका आरोग्य केंद्रात एकाच पदावर दोन स्वच्छता कामगार कार्यरत असल्याने शासनाच्या तिजोरीवर ज्यादा आर्थिक भार पडत आहे. सहसंचालक आरोग्य सेवा, मुंबई यांच्या पत्रान्वये या अतिरिक्त भरतीची दाखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
नियोजन करण्याची गरजजिल्हा परिषद भंडारा आरोग्य विभाग यांनी योग्य नियोजन करून एका प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच स्वछता कर्मचारी नियुक्त करावा. ३३ स्वछता कामगार नियमित कर्तव्य बजावत आहेत, परंतु नव्याने ३३ स्वच्छता कामगारांची नियुक्ती झाल्याने कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट झाली. अतिरिक्त स्वच्छता कामगार भरतीवर योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.