पावसात घर पडले तरी घरकूल मिळाले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:26 IST2019-07-02T22:25:55+5:302019-07-02T22:26:35+5:30
चार वर्षांपासून घरकुलासाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवूनही घरकुल तर मिळाले नाही उलट गत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या धो-धो पावसात राहते घरच कोसळले. यामुळे लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथील चौधरी परिवारावर उघड्यावर राहण्याची वेळ आली. विशेष म्हणजे भिंत कोसळल्याने पत्नीसह दोन मुले जखमी झाले.

पावसात घर पडले तरी घरकूल मिळाले नाही
दयाल भोवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : चार वर्षांपासून घरकुलासाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवूनही घरकुल तर मिळाले नाही उलट गत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या धो-धो पावसात राहते घरच कोसळले. यामुळे लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथील चौधरी परिवारावर उघड्यावर राहण्याची वेळ आली. विशेष म्हणजे भिंत कोसळल्याने पत्नीसह दोन मुले जखमी झाले. आता तरी ग्रामपंचायत घरकुलासाठी पुढाकार घेईल काय? असा सवाल पडलेल्या घराकडे शून्य नजरेने पाहत बिसन चौधरी करीत आहेत.
ढोलसर गावात गत तीस वर्षांपासून बिसन चौधरी आपल्या कुटुंबासोबत राहतात. पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. भूमीहीन असलेला बिसनचा परिवार मोलमजुरीवर चालतो. मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा गाढा ओढताना घर बांधण्यासाठी त्यांच्याकडे दमडीही शिल्लक राहत नाही. मजुरीवर घर बांधणे जमले नाही. त्यातच शासनाच्या घरकुलाची योजना आली. चार वर्षापासून बिसन घरकुलाची मागणी करीत आहेत. परंतु त्याला अद्यापही घरकुल मिळाले नाही. गतवर्षी ग्रामपंचायतीने घरकुल मंजूर झाले असे सांगत बँकेत खाते उघडण्यास सांगितले. ग्रामीण बँकेत खाते काढले तर ग्रामीण बँकेचा खाते क्रमांक चालत नाही म्हणून पुन्हा बँक आॅफ इंडियाच्या शाखेत खाते उघडायला लावले. त्यानंतरही पुन्हा स्टेट बँक आॅफ इंडियात खाते उघडण्यास भाग पाडले. असा मानसिक त्रास सहन करीत चौधरी आपल्या मोडक्या घरात राहत आहेत. तीन दिवसांपासून लाखांदूर तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसात मंगळवारी सकाळी त्यांच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे पत्नी मीराबाई, मुलगा छगन व गुणीराम जखमी झाले.
घर कोसळल्याची माहिती ग्रामपंचायतीला होताच पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली. प्रकरण आपल्यावर येईल म्हणून घरकुलासाठी धावपळ करण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले.
एका कुटुंबाचा प्रशासनाने असा छळ मांडल्याने गावात संताप व्यक्त होत आहे.
दोषींवर कारवाई करण्याची मागणी
घरकुलापासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बिसन चौधरी यांनी केली आहे. तसेच तात्काळ घरकुल मंजूर करून आपल्याला घरकुल द्यावे अशीही मागणी आहे. आता बिसनला घर केव्हा मिळते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.