देव्हाडात घरकूल वाटपात घोळ
By Admin | Updated: June 5, 2016 00:26 IST2016-06-05T00:26:38+5:302016-06-05T00:26:38+5:30
गरिबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने राजीव गांधी घरकूल योजना अस्तित्वात आणली आहे. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा

देव्हाडात घरकूल वाटपात घोळ
पहिल्याला डावलून दुसऱ्याला लाभ : तक्रारीनंतर दुसऱ्या टप्प्याची रक्कम थांबविली
भंडारा : गरिबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने राजीव गांधी घरकूल योजना अस्तित्वात आणली आहे. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील ग्रामपंचायतीने घरकुल वाटपात घोळ केला आहे. तक्रारीनंतर पंचायत समिती मोहाडीने घरकूल लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्याचा आर्थिक मोबदला थांबविला आहे.
नरसिंगटोला व देव्हाडा या दोन गावांची गट ग्रामपंचायत आहे. नऊ सदस्य संख्या असलेल्या देव्हाडा ग्रामपंचायतीने राजीव गांधी घरकूल योजनेसाठी पाठविलेल्या यादीतून निवड करण्यात आली. येथे ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना घरकूल मिळावे यासाठी ग्रा. पं. ने १ ते ७९ लोकांची मास्टर यादी तयार केली. या यादीत सुरुवातीला त्यांची नावे आहेत. अशाना डावलून प्रतीक्षा यादीत मागील नावे असणाऱ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. सन २०१५-१६ मध्ये ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना राजीव गांधी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी पंचायत समितीने ग्रामपंचायत मधून यादी मागितली. त्यानुसार ग्रामपंचायतीने देव्हाडा व नरसिंगटोला येथील ७९ नागरिकांची नावे घरकूलसाठी पाठविली.
सदर यादी ग्रामपंचायत देव्हाडा व पंचायत समिती मोहाडी येथे प्रसिध्द करण्यात आली. मात्र घरकुलचा लाभ घेताना येथील सरपंच विना तुराम व ग्रामसेवक प्रीती तभाने यांनी संगणमत करुन प्रतीक्षा यादीत अनुक्रमनिकेत मागील भागात असलेल्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आल्याचा आरोप देव्हाडा ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर रंगारी यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी रंगारी यांनी केली आहे.
(शहर प्रतिनिधी)