‘कुल वॉटर’मधून ‘हॉट वॉटर’चा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:06 IST2019-04-29T22:05:23+5:302019-04-29T22:06:11+5:30
भर उन्हाळ्यात प्रत्येकालाच थंड थंड कुल कुल पाण्याची गरज आहे. परंतु तुमसर रोड रेल्वे स्थानकावर लाखो रुपयांचे तीन थंड वॉटर कुलरमधून सध्या हॉट वॉटरचा पाणीपुरवठा सुरू आहे.

‘कुल वॉटर’मधून ‘हॉट वॉटर’चा पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भर उन्हाळ्यात प्रत्येकालाच थंड थंड कुल कुल पाण्याची गरज आहे. परंतु तुमसर रोड रेल्वे स्थानकावर लाखो रुपयांचे तीन थंड वॉटर कुलरमधून सध्या हॉट वॉटरचा पाणीपुरवठा सुरू आहे. रेल्वे प्रवाशांनी बेजबाबदार रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
दक्षिण-पूर्व रेल्वेच्या तुमसर रोड रेल्वे स्थानकावर मेल, एक्स्प्रेस तथा लोकल प्रवाशी गाड्यांचा थांबा आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एक, दोन व तीनवर उन्हाळ्यासह इतर सिझनमध्ये शुद्ध व थंड पाण्याचा पुरवठ्याकरिता तीन वॉटर कुलर लावले आहेत. सध्या उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. प्रवाशी रेल्वेगाड्या प्लटफॉर्मवर थांबल्यावर तहानलेले व शेकडो रेल्वे प्रवाशी थंड वॉटर कुलरकडे धाव घेतात. तिथे त्यांना थंड पाण्याऐवजी अतिशय गरम पाणी येत असल्याचा अनुभव येतो. नाव थंड वॉटर कुलर असून गरम पाण्याचा पुरवठा येथे करण्यात येत आहे.
नागपूर विभागात तुमसर रोड रेल्वे स्थानक तिसºया क्रमांकावर असून रेल्वे अधिकाऱ्यांचे येथून नेहमीच ये-जा आहे. मुलभूत समस्येकडे त्यांचे लक्ष जात नाही काय, असा प्रश्न संतप्त रेल्वे प्रवाशांनी उपस्थित केला आहे. किमान उन्हाळ्यात तांत्रिक दुरूस्ती करून थंड पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे.
भर उन्हाळ्यात तृष्णा भागविण्यासाठी प्रवाशांकरिता सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करीत आहे. मात्र तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील तृष्णा भागविणारे साधन नादुरुस्त असल्यामुळे रेल्वे प्रशासनाचा दावा येथे फोल ठरत आहे. याकडे रेल्वे समितीने लक्ष देण्याची गरज आहे.
चार हजार रेल्वे प्रवासी
उन्हाळ्याच्या हंगामात तुमसर रोड रेल्वे स्थानकावरून दररोज चार हजार रेल्वे प्रवाशी ये-जा करतात. मुंबई हावडा मार्गावरील रेल्वे स्थानक रेल्वेला मोठा महसूल प्राप्त करून देतो. जंक्शन रेल्वे स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष येथे दिसत आहे.
रेल्वेमंत्र्याकडे तक्रार
तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील तीन वॉटर कुलर मागील काही दिवसापासून नादुरूस्त असून त्यातून गरम पाण्याचा पुरवठा सुरू आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात कमालीचे तापमान वाढले आहे. यंत्राची दुरूस्ती येथे केली जात नाही. याप्रकरणी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचेकडे तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी स्थानिक रेल्वे प्रशासन मूग गिळून गप्प दिसत आहे.
थंड वॉटर कुलरची पाटी पाहून शेकडो रेल्वे प्रवाशी याकडे धावून जातात. परंतु तिथे गेल्यावर गरम पाणी पाहून त्यांचा भ्रमनिराश होतो. रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून तात्काळ वॉटर कुलर दुरूस्त करण्याची गरज आहे.
-संजय बुराडे,
रेल्वे प्रवाशी, तुमसर.