‘मे’ चा पहिला आठवडा राहिला ‘हॉट’
By Admin | Updated: May 10, 2015 00:52 IST2015-05-10T00:52:12+5:302015-05-10T00:52:12+5:30
उन्हाळ्यातील असह्य तापमान जनजीवन विस्कळीत करते. अंगाची लाही-लाही होत असते.

‘मे’ चा पहिला आठवडा राहिला ‘हॉट’
भंडारा : उन्हाळ्यातील असह्य तापमान जनजीवन विस्कळीत करते. अंगाची लाही-लाही होत असते. यावर्षी उन्हाळयात पावसाने हजेरी लावली असली तरी तापमानात काही घट झालेली नाही. ‘मे’ महिन्याचा आठवड्यातील तापमानाचा आलेख वाढत आहे. गत आठवड्यात कमाल तापमान ४३ अंशांपर्यंत पोहोचल्याने पुढूल दिवसात तापमानात नक्की वाढ होईल यात शंका नाही. तसा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
यावर्षी संपूर्ण ऋतूचक्रच बदलले आहे. उन्हाळ्यात पावसाला सुरुवात झाली. एप्रिल महिन्यात ५0 मिमीपेक्षा जास्त पाऊस विदर्भात कोसळला. ढगाळ वातावरण व एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात तीन वेळा पाऊस झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळाला. मात्र, गत तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत असून, आगामी आठवड्यात यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
२६ एप्रिल रोजी ३५.४ डिग्री तापमान होते. यामध्ये वाढ होत २७ एप्रिल रोजी ४0 डिग्री तापमान झाले तर २८ एप्रिल रोजी ४० डिग्रीपर्यंत तापमान पोहोचले. २५ एप्रिलपासून ३0 एप्रिलपर्यंत ५ डिग्री तापमानात वाढ झाली. यामध्ये आणखी वाढ होऊन १५ मे पर्यंत तापमान ४५ डिग्रीवर पोहोचण्याची शक्यता आहे. आगामी आठवड्यात ढग व पावसाची शक्यता नसून, वातावरण कोरडे राहणार आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका आणखीनच वाढणार आहे.दरम्यान दि.१३ मे पर्यंत ढगाळ वातावरणाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)