डॉक्टरांअभावी रुग्णसेवा वाऱ्यावर
By Admin | Updated: August 6, 2016 00:34 IST2016-08-06T00:34:34+5:302016-08-06T00:34:34+5:30
सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्ण वाऱ्यावर असून व्यवस्था कोलमडली आहे.

डॉक्टरांअभावी रुग्णसेवा वाऱ्यावर
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : डॉक्टरांना कामावर रूजू करा अन्यथा पर्यायी व्यवस्था करा
भंडारा : सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्ण वाऱ्यावर असून व्यवस्था कोलमडली आहे. डॉक्टरांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यातील सामान्य, गरीब रुग्णांसाठी एकमेव आशास्थान असलेले सामान्य रुग्णालय हे स्वत:च डायलिसीसवर असल्यामुळे रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांचे भविष्य धोक्यात आले तरी रुग्णालयाचे शल्यचिकित्सक हातावर हात धरून बसले असल्याचा स्पष्ट आरोप निवेदनाद्वारे केला आहे.
जिल्ह्यात सगळीकडे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारामुळे शासकीय तसेच खासगी दवाखाने रुग्णांनी फुलून गेलेली आहेत. अशातच ग्रामीण रुग्णांसाठी मोठा आधार असलेला सामान्य रुग्णालयात मात्र सेवेत असणारे डॉक्टर्स बळजबरीने मागील आठ दिवसांपासून तर कोणी पंधरा दिवसांपासून सुट्यावर गेलेले असल्यामुळे सामान्य रुग्णालयातील व्यवस्था संपूर्णपणे कोलमडलेली आहे. याच रुग्णालयातील लेबर रुमसाठी ५ डॉक्टरांची नियुक्ती आहे. परंतु त्यापैकी डॉ.निवाने, डॉ.बांडेबुचे आणि डॉ.खोब्रागडे या मागील दहा बारा दिवसापासून आजाराचे कारण दाखवून सुट्यांवर असल्यामुळे यांचा कामाचा ताण केवळ दोन डॉक्टर्सवर आल्यामुळे दिवसेंदिवस डिलेवरी वॉर्डात रुग्णांची वाढ होतच आहे. आजच्या घडीला २०० हून अधिक महिला रुग्ण डिलेवरीसाठी वाट बघताहेत. परंतु यासाठी मात्र डॉ.भावसार व डॉ.बागडे हेच सेवा देत आहेत.
सामान्य रुग्णालयावर रुग्णांचा ताण वाढत असल्यामुळे डॉक्टर मंडळी या रुग्णांना मेडीकल कॉलेज नागपूर येथे बळजबरीने रेफर करीत आहेत. त्यामुळे याचा नाहक भुर्दंड गरीब रुग्णांवर सोसावा लागत आहे. असे असतानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते रुग्णालयाची परिस्थिती हाताळण्यास असमर्थ ठरत असून ज्या डॉक्टरांनी आजाराचे कारण देवून सुट्या घेतल्या तीच डॉक्टर मंडळी स्वत:च्या खासगी रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवित आहेत. त्यामुळे या डॉक्टरांना ताबडतोब २४ तासात कामावर रूजू होण्याचे आदेश द्यावेत, रूजू न झाल्यास त्यांना कामावरून काढून टाकावेत तसेच तोपर्यंत अन्य ठिकाणाहून पर्यायी व्यवस्था म्हणून किमान चार गायनीक डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात शिवसेनाद्वारे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, तालुका प्रमुख अनिल गायधने, शहर प्रमुख नितीन साकुरे, ललीत बोंद्रे, विशाल लांजेवार, यशवंत टिचकुले, मयूर लांजेवार, आकाश जनबंधू, राजेश मेश्राम पं.स. सदस्य, पंकज दहिकर, सुधीर उरकुडे, प्रकाश पारधी यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)