प्रामाणिकपणा आजही कायम

By Admin | Updated: July 11, 2015 01:39 IST2015-07-11T01:39:14+5:302015-07-11T01:39:14+5:30

जगात ईमानदारी सारखा मोठेपणा नाही आणि बेईमानी सारखा दुष्कर्म नाही. ईमानदारीमुळे मनुष्य सर्वांचेच विश्वास संपादन करतो ...

Honesty persists even today | प्रामाणिकपणा आजही कायम

प्रामाणिकपणा आजही कायम

रोखपालाने मानले आभार : बँकेने दिलेले ६० हजार केले परत
भंडारा : जगात ईमानदारी सारखा मोठेपणा नाही आणि बेईमानी सारखा दुष्कर्म नाही. ईमानदारीमुळे मनुष्य सर्वांचेच विश्वास संपादन करतो व समाजात आदर्श स्थान मिळवितो. असाच आदर्श सनफ्लॅग कंपनीतील एक कर्मचाऱ्याने समाजापुढे घालून दिला आहे.
गंभीरसिंह यदुवंशी हे वरठी येथील सनफ्लॅग स्टील कंपनीत कार्यरत आहेत. त्यांचे वेतन कॅनरा बँकेत जमा होते. दि. ८ जुलै रोजी यदुवंशी हे सकाळी भंडारा शहरातील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढायला गेले असता काही तांत्रिक कारणामुळे पैसे निघाले नाहीत. त्यानंतर ते घरी जाऊन कॅनरा बँकेचा धनादेश घेऊन बँकेत गेले. त्यांनी तिथून १६ हजार रुपयांचे धनादेश दिला.
परंतु तेथील बँक रोखपालाने त्यांना १६ हजार रुपयाऐवजी शंभर रुपयांची एक आणि पाचशे रुपयांची एक बंडल असे एकूण ६० हजार रुपये दिले. मुलांची प्रकृती अस्वस्थ असल्याने यदुवंशी हे कॅनरा बँकेतून घेतलेले पैसे न मोजता भारतीय स्टेट बँकेत जमा करण्यासाठी गेले. तिथे त्यांना १६ हजार रुपयांऐवजी ६० हजार मिळाल्याचे दिसून आले. त्यानंतर ६० हजाराची रक्कम घेऊन ते कॅनरा बँकेत पोहोचले. तेथील बँकेच्या कर्मचाऱ्यासमोर ६० हजार रुपयांची रक्कम परत करुन आपल्या खात्यातील केवळ सोळाच हजार रुपये घेतले.
कॅनरा बँकेच्या रोखपालाच्या चुकीने यदुवंशी यांना तब्बल ४४ हजार रुपये जास्त मिळाले होते. परंतु, यदुवंशी यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी संपूर्ण रक्कम बँकेत परत करुन असा निष्काळजीपणा करु नका असा सल्ला दिला.
यदुवंशी यांच्या मनात लोभ निर्माण झाला असता तर ४४ हजार रुपयांचा त्यांना लाभ झाला असता. जास्तीचे ४४ हजार रुपये बँकेत परत करुन प्रामाणिकपणाचे उदाहरण यदुवंशी यांनी दाखवून दिले. समाजाने त्यांचा आदर्श बाळगण्याची गरज आहे. त्यानंतर गंभीरसिंह यदुवंशी म्हणाले, एकदा कामावर असताना माझे तीन हजार रुपये हरविले होते. तेव्हा मी खूप दु:खी झालो होतो. पैसे हरविण्याचे दु:ख मला माहिती आहे. म्हणून मी स्वत: वेळ न दवडता बँकेतील जास्तीची रक्कम परत केल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Honesty persists even today