घराघरांत ग्रामगीतेचे वाचन गरजेचे
By Admin | Updated: November 29, 2014 23:15 IST2014-11-29T23:15:59+5:302014-11-29T23:15:59+5:30
जीवन सुखमय व आनंदी करण्यासाठी कर्तव्यतत्परता आवश्यक आहे. शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांची विचारसरणीच जगाला तारू शकते.

घराघरांत ग्रामगीतेचे वाचन गरजेचे
पालांदुरात कार्यक्रम : सत्यपाल महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी
पालांदूर (चौ.) : जीवन सुखमय व आनंदी करण्यासाठी कर्तव्यतत्परता आवश्यक आहे. शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांची विचारसरणीच जगाला तारू शकते. आपल्या आचरणात, विचारात अपेक्षित बदल घडण्याकरिता प्रत्येक घरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचे वाचन महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सत्यपाल महाराज यांनी केले.
पालांदूर येथे शहीद श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर खा. नाना पटोले, तारीक कुरैशी, जिल्हा परिषद सदस्य सविता ब्राम्हणकर, भरत खंडाईत, वैशाली खंडाईत, उत्तम नंदनवार, उद्योगपती चांदे उपस्थित होते.
सत्यपाल महाराज म्हणाले, प्रत्येक घरात शौचालयाचा वापर करण्याची गरज आहे. गावात रोजगार शोधल्यास बेरोजगारी कमी होईल. आई वडिलांची सेवा हिच ईश्वरसेवा आहे.
कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, तुझ गावच नाही तिर्थ ही तुकडोजींची वाणी गात खान्देशाची ढोलकीचा ताल सप्तखंजेरीतून धरला. अत्यंत मनमोहक शैलीत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून चित्रपटांच्या गाण्यांच्या सोबतीने तीन तास प्रबोधन केले. सत्यपाल महाराजांना पेटीवादक गजानन चिंचोळकर, तबलावादक राहुल सोनवाने, सुनिलकुमार व सुखदेव चिंचोळकर यांनी साथ दिली. कार्यक्रम माला उपस्थितांचे आभार जि.प. सदस्य भरत खंडाईत यांनी मानले. (वार्ताहर)