तुमसरातील ऐतिहासिक ५२ दारी वास्तू भुईसपाट
By Admin | Updated: September 17, 2014 23:34 IST2014-09-17T23:34:50+5:302014-09-17T23:34:50+5:30
भंडारा जिल्ह्यातील जूनी ब्रिटीशकालीन तुमसर नगरपरिषदेला सुमारे १४९ वर्षे झाली आहेत. सुमारे १३० वर्षापूर्वी जुने गंज बाजाराची भव्यदिव्य वास्तू नगरपरिषदेसमोर तयार करण्यात आली होती.

तुमसरातील ऐतिहासिक ५२ दारी वास्तू भुईसपाट
१३० वर्षे जुनी इमारत : कच्छ प्रांतातील वास्तू नामशेष
तुमसर : भंडारा जिल्ह्यातील जूनी ब्रिटीशकालीन तुमसर नगरपरिषदेला सुमारे १४९ वर्षे झाली आहेत. सुमारे १३० वर्षापूर्वी जुने गंज बाजाराची भव्यदिव्य वास्तू नगरपरिषदेसमोर तयार करण्यात आली होती. ती ऐतिहासिक तथा भव्यदिव्य ५२ दारी वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमणाचा येथे विळखा होता. ऐतिहासीक वास्तु जतन करून इतर बांधकाम करण्याची येथे गरज होती.
तुमसर नगरपरिषदेची स्थापना २७ मे १८६५ मध्ये झाली असे दस्तऐवजात नमूद आहे. तुमसर नगरपरिषदेचे पहिले अध्यक्ष मुहूर्त जनाब मौलाना बख्त हे होते. त्यांचा कार्यकाळ दस्तऐवजात नमूद आहे. आतापर्यंत २७ नगराध्यक्षांनी या इमारतीत आपला कार्यकाळ घालविला.
गुजरातच्या कच्छ प्रांतातून पहिले नगराध्यक्ष मुर्हूम जनाब मौला बख्त आले होते. त्यांनी तुमसर नगर परिषदेचे किल्ल्यासारखे प्रवेशद्वार तयार केले होते. अतिशय देखणे प्रवेशद्वार येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. आजही ते दिमाखाने उभे आहे. या प्रवेशद्वाराच्या बांधकामाकरिता कच्छमधून कारागीर आणण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष बख्त यांनी नगरपरिषदेच्या समोरील मोकळ्या जागेत ५२ दारी भव्यदिव्य वास्तु तयार केली होती. सतत तीन ते चार वर्षे या इमारत बांधकामाला लागले होते. दगड, विटा व चुनखडीने ही वास्तु तयार झाली होती. गुजरात राज्यात भव्य कमानी व भरपूर दारे असलेल्या इमारती आजही आहेत. येथे पुढे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत होती. कृषी मालाची आवक वाढल्याने २२ वर्षांपुर्वी बाजार समिती भंडारा रोड व शहराबाहेर नेण्यात आली.
येथे तुमसरेश्वर महागणपतीचे मंदीर पश्चिम दिशेला आहे. ५२ दारी व मंदीर परिसरात किरकोळ फूटपाथ दुकानदारांनी अतिक्रमण केले होते. ८० ते ९० दुकाने येथे होती. या दुकानामुळे मंदीरात व बाजारात जाताना नागरिकांना त्रास व्हायचा. रस्त्यावरच वाहने उभी ठेवली जायची. वाहतुकीची कोंडी येथे मोठ्या प्रमाणात होत होती.
दर मंगळवारी तुमसरात आठवडी बाजाराच्या दिवशी तर प्रचंड गर्दी व्हायची. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी येथील अतिक्रमण काढणे रखडले होते. नवीन नगराध्यक्षांनी सर्व अतिक्रमण तात्काळ काढले. सर्व फूटपाथ दुकानदारांवर अन्याय होणार नाही, अशी भूमिका घेवून ८ बाय ८ चे तात्पुरते दुकान देण्याची घोषणा दिली. त्यानुसार कारवाई सुरू आहे.
ऐतिहासीक वारसा वास्तु येथे जतन करण्याची मात्र गरजेचे होते. ती वास्तु भूईसपाट करण्यात आली. वास्तू तज्ञांचा सल्ला घेवून त्यात बदल करून नव्याने इमारत नुतनीकरणाची गरज होती. अनेक वर्षे वास्तु रिकामी असल्याने अनेक ठिकाणी ती खचली होती.
एखादा मोठा अपघात होण्याची येथे शक्यता होती. आता येथे मोकळा श्वास घेता येतो, परंतु हा श्वास किती वर्षे घेता येईल हा मुख्य प्रश्न आहे. राजकीय इच्छाशक्ती व निर्णयाला तुमसरकरांनी साथ देणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)