पवनीतील ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2017 00:58 IST2017-05-20T00:58:54+5:302017-05-20T00:58:54+5:30
विदर्भाची काशी म्हणून ख्याती असलेल्या पवनी नगरातील प्राचिन आणि ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे असे पुरातत्त्व विभाग,

पवनीतील ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित
पर्यटन विकास कसा होणार : प्रशासनाने लक्ष देण्याची गरज, गतवैभवाची प्रतीक्षा
अशोक पारधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : विदर्भाची काशी म्हणून ख्याती असलेल्या पवनी नगरातील प्राचिन आणि ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे असे पुरातत्त्व विभाग, लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन यापैकी कोणालाही वाहत नाही. ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित असल्याने त्यांची पडझड होत आहे. त्यामुळे पवनीतील पर्यटन विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
नगराला इंग्रजी यु आकाराचे भिंतीचे बंदिस्त केलेले असल्याने पवनीचा खरा चेहरा बाहेरून ये-जा करणाऱ्या प्रवासी नागरिकांना दिसत नाही. त्यामुळे नगराचा विकास खुंटलेला आहे, असे नागरिकांना वाटते. नगरात शेकडोच्या संख्येने मंदिर आहेत.
त्यापैकी विदर्भातील अष्टविनायक पंचमुखी गणेश मंदिर, वैजेश्वर मंदिर, मुरलीधराचे मंदिर दत्त मंदिर, धरणीधर गणेश मंदिर, रांझीचा गणेश मंदिर, चंडिका माता मंदिर, जगन्नाथ मंदिर, दुर्गा माता मंदिर, कालका व ज्वाला माता मंदिर, भंगार माता मंदिर, एकविरा माता मंदिर, धोबी तलाव माता मंदिर, मस्तान शाँ दर्गा, निलकंठेश्वराचे मंदिर असे कित्येक मंदिर प्रसिद्ध आहेत. गरूड खांब लक्ष वेधून घेतात. जवाहर गेट व ऐतिहासिक परकोट पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
भारतीय पुरातत्व विभागाने उत्खननात शोधलेले जगन्नाथ मंदिर परिसरातील भव्य बौद्ध स्तुपांचे अवशेष या सर्वांसोबत वैनगंगा नदीकाठावर बांधण्यात आलेले ऐतिहासिक घाट पर्यटकांना आकर्षित करतात. भंडारा-गांदिया, गडचिरोली मार्गाने पुलावरून येणारा प्रत्येक प्रवासी दिवानघाटाकडे पाहिल्याशिवाय पवनी नगरात प्रवेश करीत नाही.
वैनगंगा नदीतटावर दिवाणघाट, वैजेश्वर घाट पानखिडकी घाट, तराबाई घाट या घाटांचे बांधकाम भोसल्यांचे राजवटीत करण्यात आल्याचे सांगितल्या जाते. तेव्हापासून आतापर्यंत दिवाण घाट स्रानासाठी व कपडे धुन्यासाठी वापरल्या जात होता परंतु घाटाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.
घाटावर बांधण्यात आलेले बुरूज व दरवाजे खचून ढासळू लागले आहेत. पालिकेने घाट धोकाायक असल्याचे जाहिर केले आहे. मात्र घाटावर लोकांची ये-जा सुरू आहे. कित्येक दशकानंतर भंडारा विधानसभा क्षेत्राला पवनीमधून अॅड. रामचंद्र अवसरे यांना प्रतिनिधीत्व मिळाले. पर्यटन विकासाला चालना मिळून पवनीचा विकास होईल असा विश्वास पवनीकरांना वाटत होता परंतू पडझड होत असलेल्या ऐतिहासिक वास्तूसाठी अडीच तीन वर्षात राज्य शासनाकडून निधी मिळू शकला नाही. पालिका प्रशासन अद्यापही सिमेंट काँक्रीट रस्ते व नाल्या यात गुंतलेला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा जतनासाठी अद्यापही योजना तयार करण्यात आलेली नाही. असेच धोरण राहिले तर ऐतिहासीक वास्तू नामशेष होईल व पवनीचा पर्यटन विकास खुंटेल, असे मानने वावगे ठरणार नाही.