शेतकरी हवालदिल
By Admin | Updated: June 12, 2017 00:33 IST2017-06-12T00:33:52+5:302017-06-12T00:33:52+5:30
कर्जाची उचल बँकांतून करताना दुय्यम निबंधकासमक्ष मुद्रांकावर शेती गहाण ठेवल्यावरही तलाठ्याकडे बोजा चढविणे,

शेतकरी हवालदिल
कर्जप्रकरण: एक ते सव्वा महिन्याचा अवधी लागतो
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कर्जाची उचल बँकांतून करताना दुय्यम निबंधकासमक्ष मुद्रांकावर शेती गहाण ठेवल्यावरही तलाठ्याकडे बोजा चढविणे, सातबारावर त्याची नोंद करणे तथा त्यानंतर बँकेच्या विविध अटींचा सोपस्कार शेतकऱ्यांना पूर्ण करावा लागतो. खरीपाचा हंगाम तोंडावर आल्यावरही पुन्हा शेतकऱ्यांना किमान एक ते सव्वा महिना कर्ज मिळण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. सध्या हजारो शेतकरी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात चकरा मारत आहेत.
खरीपाचा हंगाम सुरु झाला असून शेतकरी बँकाकडून कर्ज प्राप्त करण्याकरिता खेटा मारित आहे. कर्ज प्राप्त करण्याकरिता मोठ्या अग्नीदिव्यातून सध्या शेतकऱ्यांना जावे लागत आहे. प्रथम तलाठ्याकडून सातबारा घेतल्यावर दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जाऊन मुद्रांकावर दुय्यम निबंधकासमोर कर्ज उचल करण्याबाबत माहिती नमूद करावी लागते. नंतर तलाठ्याकडे सातबारावर शेतीवर बोजा चढवावा लागतो. नंतर सातबारा वर फेरफारची नोंद करावी लागते. त्यानंतर बँकेकडे रितसर अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. बँकेकडून कर्ज प्राप्त झाल्यानंतर शेतीवरील बोजा कमी करण्याकरिता पुन्हा तलाठी कार्यालयात जाऊन शेतीवरील बोजा कमी करून त्याची सातबारात नोंद करणे आवश्यक आहे. आधारकार्ड लिंक असल्याने एक शेतकरी दुसरे कर्ज दुसऱ्या बँकेतून घेऊ शकत नाही. त्यामुळे ही पद्धती बंद करण्याची मागणी हजारो शेतकऱ्यांनी केली आहे.
किमान एक ते सव्वा महिने फेरफार होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. एकरी ५० हजारांचे कर्ज मिळते. परंतु त्याकरिता शेतकऱ्यांना प्रथम खिशातून विविध सोपस्कार पार पाडण्याकरिता किमान ५ ते ६ हजार रुपये खर्च करावे लागतात. अशी तक्रार पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.
राष्ट्रीयकृत बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज देणे सुरु आहे. अनेक जाचक नियमांमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. बँकेत, तहसील कार्यालयात तथा तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसत आहे. अनेक अर्ज भरताना शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडत असून दुसऱ्याची मदत येथे शेतकरी घेताना दिसत आहे.
सध्या शेतकरी बांधावर दिसण्यापेक्षा बँकेच्या चकरा मारताना जास्त व्यस्त दिसत आहे. कागदपत्रांचा ससेमीरा कमी होण्यापेक्षा उलट वाढल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.