अपहृत मुलगा वडिलांच्या सुपूर्द
By Admin | Updated: July 3, 2014 23:22 IST2014-07-03T23:22:35+5:302014-07-03T23:22:35+5:30
तीन ते चार युवकांनी शाळेतून घरी परतणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर हावडा-मुंबई या प्रवासी रेल्वेत सोडून दिले. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर

अपहृत मुलगा वडिलांच्या सुपूर्द
हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमधील घटना : रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
तुमसर : तीन ते चार युवकांनी शाळेतून घरी परतणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर हावडा-मुंबई या प्रवासी रेल्वेत सोडून दिले. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर त्या मुलाला शुद्ध आल्यानंतर त्याने रेल्वे पोलिसांना हकीकत सांगितली. रेल्वे पोलिसांनी त्याच्या वडिलांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले. मनोजकुमार ज्ञानकुमार शाहू (१५) रा.तुमडीबोड जि.राजनांदगाव (छत्तीसगड) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.
मनोजकुमार शाहू हा दि.२ रोजी दुपारी शाळेतून घरी परत येताना तीन ते चार युवकांनी त्याचे अपहरण केले. त्याच्या शरीरावर ब्लेडने गंभीर जखमा केल्या. त्यानंतर हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस रेल्वेत त्याला बेशुद्धावस्थेत डोंगरगड रेल्वेस्थानकावरून सोडून दिले. पाच तासानंतर तो शुद्धीवर आला. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबली. रेल्वेतून खाली उतरल्यानंतर त्याने रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे पोलीस एम.एन. झोडे यांना हकीकत सांगितली.
त्यांनी मनोजच्या वडिलांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली. ३ जूनला सकाळी ११ वाजताच्या सुमारास तुमसर रेल्वेस्थानकातील पोलीस निरीक्षक सी.के. टेंभुर्णीकर, एम.एन. झोडे, आलम खान यांच्या उपस्थितीत मनोजला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. वडिलांना पाहून आनंदीत झालेल्या मनोजने अश्रुला वाट करुन दिली.
ज्ञानकुमार शाहू यांनी मनोजचे दुसऱ्यांदा अपहरण करण्यात आल्याची माहिती पोलिसांना सांगितली. २७ मे रोजी मनोजचे पहिल्यांदा अपहरण झाले होते. याची तक्रार पोलिसात दिली होती. दि. २ जून रोजी डोंगरगड येथे मनोज हरविल्याची तक्रार दिली होती. तुमसर पोलिसांनी सर्वप्रथम डोंगरगड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला होता. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने मनोज सुखरूप घरी आला होता. (तालुका प्रतिनिधी)