महामार्गावरील उड्डाणपूल ठरतोय जीवघेणा
By Admin | Updated: August 6, 2014 23:39 IST2014-08-06T23:39:45+5:302014-08-06T23:39:45+5:30
राष्ट्रीय महामार्गाच्या मुजबी ते पारडी दरम्यान करण्यात आलेल्या विस्तारीकरणात शहापूर येथे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. हा उड्डाणपुल वाहतुकीला खुला करण्यात आल्यानंतर पहिल्याच

महामार्गावरील उड्डाणपूल ठरतोय जीवघेणा
व्यथा राष्ट्रीय महामार्गाची : अर्धवट कामामुळे नागरिकांना सोसावा लागतोय त्रास
दिनेश भुरे - शहापूर
राष्ट्रीय महामार्गाच्या मुजबी ते पारडी दरम्यान करण्यात आलेल्या विस्तारीकरणात शहापूर येथे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. हा उड्डाणपुल वाहतुकीला खुला करण्यात आल्यानंतर पहिल्याच पावसात उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीखाली जीवघेणे भगदाड पडले आहेत. एखाद्या दिवशी मोठी प्राणहाणी घडल्यावर प्रशासनाला जाग येणार काय? असा प्रश्न नागरीक विचारीत आहेत.
पुलाखालील माती, दगडाचे थर, पुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नाल्या, मातीवर घालण्यात आलेली मॅटींग घसरल्याने अनेक ठिकाणी भगदाड पडले आहेत. पावसाचे पाणी उड्डाणपुलावरून निचरा होण्याकरिता तयार करण्यात आलेली प्रणाली पूर्णपणे निरुपयोगी ठरली आहे. पावसाचे पाणी वहन होण्याकरिता जी रचना उड्डाणपुलावर तयार करण्यात आली आहे ती सदोष असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
या उड्डाणपुलावर वाहतुकीकरिता दुहेरी मार्ग असून रस्त्याच्या दुतर्फा मोठी भिंत उभी केली आहे. रस्त्याच्या मधोमध विभाजक तयार करण्यात आले आहे. भिंतीच्या बाजूला लोखंडी कठडे असून ओटी भिंत व कठड्याखालून उड्डाणपुलावरील पाणी वाहून जाण्याकरिता नालीसदृष्य पोकळी ठेवण्यात आली आहे.
त्याखाली संरक्षक भिंतीला अर्धगोलाकार सिमेंट पायलीची नाली ‘सर्व्हीस रोड’च्या दिशेने तयार करण्यात आली आहे. नालीच्या दोन्ही बाजूस काळ्या दगडाचे चर लावण्यात आले आहेत. मात्र उड्डाणपुालवरील छोट्या भिंतीमधील पोकळी व संरक्षक भिंतीवर तयार करण्यात आलेल्या नालीचा ताळमेळ बसत नसल्याने पुलावरील पाणी या नाल्यामधून वाहून जात नाही. त्याचा परिणाम पावसाचे पाणी उड्डाणपुलावरच जमा होऊन महामार्गानेच उताराच्या दिशेने वाहून जाते. याचा फटका रहदारीला बसत असतो. पावसामध्ये वाहतूक सुरु असताना महामार्गावर पाण्याचे कारंजे बघावयास मिळतात.
नाल्या घसरु लागल्या
राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाकरिता तयार करण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवरील अर्धगोलाकार पायल्याच्या नाल्या सिमेंटचा वापर करून बंदिस्त करण्यात येवून शेजारी दगडाचे थर देण्यात आले. पावसामुळे त्याखालीची माती बसल्यामुळे व वाहून गेल्यामुळे संरक्षक दगडाचे चर जागचे हलले नाहीत.
त्यामुळे तयार करण्यात आलेल्या बहुतांशी नाल्या सर्व्हीस रोडच्या दिशेने घसरल्या आहेत. या भागातून घसरलेली माती सर्व्हीस रोडच्या कडेला जमा झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाच्या कामाची गुणवत्ता उघड्यावर आली आहे.
एकच बोगदा
या उड्डाणपुलामुळे गावाचे दोन भागात विभाजन झाले असून जवळपास अर्धा कि.मी. लांब अंतर असलेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला आवागमनाकरीता फक्त एकच बोगदा देण्यात आला आहे. त्याचा फटका स्थानिक ग्रामस्थांसोबत परिसरातील नागरिकांनाही सहन करावा लागत आहे.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथे तीन बोगदे देण्यात यायला पाहिजे होते. एक बौद्ध विहाराजवळ, दुसरा आहे तिथे व तिसरा बाजाराजवळ अशी आवश्यकता असताना बोगदा मात्र एकाच ठिकाणी देण्यात आला. जवळपास सव्वा किलोमीटर पर्यंत ग्रामस्थांची ससेहोलपट वाढली आहे. बोगद्याव्यतिरिक्त इकडून तिकडे जायचे असेल तर एम.आय.ई.टी. कॉलेज नंतर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या वळण रस्त्याचाच वापर नागरिकांना करावा लागत आहे.