सट्ट्यातील गुंतवणुकीने गाठला उच्चांक
By Admin | Updated: November 3, 2014 23:19 IST2014-11-03T23:19:58+5:302014-11-03T23:19:58+5:30
आकड्यांचा खेळ अन् पैशांचा पाऊस असे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र सट्ट्यात पैसा गुंतवणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढत चालली आहे. लाखांदूर तालुक्यात सट्ट्यातील आर्थिक

सट्ट्यातील गुंतवणुकीने गाठला उच्चांक
लाखांदूर : आकड्यांचा खेळ अन् पैशांचा पाऊस असे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र सट्ट्यात पैसा गुंतवणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढत चालली आहे. लाखांदूर तालुक्यात सट्ट्यातील आर्थिक गुंतवणुकीने उच्चांक वाढविला आहे. याकडे मात्र जिल्हा पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते.
विशेष म्हणजे या सट्ट्याच्या गुंतवणुकीत मोठ्यांसह लहान्यांनीही हजेरी लावली आहे. शिक्षण घेण्याच्या वयात सट्ट्याचा शुभांक शोधण्याचे कार्य विद्यार्थीगण करीत आहेत. तसेच युवक वर्गाचा या व्यवसायात कल वाढत आहे. बँकेत सही चुकली म्हणून खात्यातून पैसे काढण्यात अडचण येत असताना केवळ सट्ट्याच्या या व्यवसायात लहानशा चिट्ठीवर निकाल ठेवून लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. लाखांदूर तालुक्यात हा प्रकार बिनबोभाटपणे व तितकाच गुंतागुंतीचा झाला आहे. तालुक्यात सट्टा व्यवसायाचे चांगले नेटवर्क आहे. यात लाखांदुरातील कुणाकुणाची दररोज लक्षावधींची कमाई होत आहे.
बेकायदेशीर तितकाच विश्वास ठेवणारा हा व्यवसाय महिन्याकाठी लाखोंची उलाढाल करणारा आहे. संपूर्ण तालुक्यात सट्टा व्यवसाय चालत असून लाखांतील एका दुकानदार हा व्यवसाय बिनदिक्कतपणे चालवित आहे. दिवसा अमुक तर रात्री दुसऱ्याच नावाने चार आकड्यांचा खेळ खेळला जातो. सर्वत्र नगदी व्यवहार असल्याने व्यवसाय चालविणाऱ्याला कुठलीही झळ बसत नाही. तर दुसरीकडे असंख्य कुटुंब दारिद्र्याच्या खाईत लोटत आहेत.
सट्ट्याचा आकडा न फसल्यामुळे दारुच्या आहारी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ३ ते १० टक्के कमीशनवर एजंट असल्याने तरुणांचा जत्था या व्यवसायात हिरीरीने भाग घेत आहेत. बारव्हा, तई, चिचोली, पारडी, बोथली, लाखांदूर, या ठिकाणी जवळपास पंधरा एजंट आहेत. एकट्या लाखांदूर शहरात आठ एजंट आहेत. पंचायत समिती परिसर, शिवाजी चौक, बाजार समिती, किन्हाळा, डोकेसरांडी, बसस्थानक, पिंपळगाव कोहळी, चिचगाव आदी ठिकाणी हे एजंट आहेत. या सर्वांची संख्या २३ च्या घरात आहे. (तालुका प्रतिनिधी)