सोशल मीडियातील ग्रुपच्या माध्यमातून अनाथ भावंडांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:46+5:30
साकोली येथील नरेश तिडके आपल्या परिवारासह राहत होते. सहा वर्षापुर्वी आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार होता. वडिलांच्या निधनानंतर आईच्या आधाराने राहत होती. परंतु ऑगस्ट महिन्यात नरेशची पत्नी निशा हिचाही आजारपणात मृत्यू झाला.

सोशल मीडियातील ग्रुपच्या माध्यमातून अनाथ भावंडांना मदत
संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर कसा करतो यावर त्याचे यश अवलंबून आहे. अलिकडे सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर रचनात्मक कामापेक्षा विघातक गोष्टीसाठीच होत असल्याचे दिसून येते. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातूनही एखाद्याला जगण्याचा आधार मिळू शकते हे साकोली येथील सितारे ग्रृपने सिद्ध करून दाखविले. आई-वडिलांचे कृपाछत्र हरविल्यानंतर अनाथ झालेल्या भावंडांना ५१ हजार रूपयांची मदत या ग्रृपच्या माध्यमातून करण्यात आली.
साकोली येथील नरेश तिडके आपल्या परिवारासह राहत होते. सहा वर्षापुर्वी आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार होता. वडिलांच्या निधनानंतर आईच्या आधाराने राहत होती. परंतु ऑगस्ट महिन्यात नरेशची पत्नी निशा हिचाही आजारपणात मृत्यू झाला. त्यामुळे जागृती (१७), मैथिली (१५) आणि हिमान्शु हे तीन भावंडे उघड्यावर आले. रहायला साधे घरही नाही, काय करावे असा त्यांच्यापुढे प्रश्न होता. मात्र यावेळी सितारे नावाचा व्हॉटसअप ग्रृप त्यांच्या मदतीला धावून आला. त्यासाठी ग्रृपचे सदस्य बशीर खान, विनायक देशमुख, उमेश भुरे, ओम गायकवाड, दिलीप मासूरकर, जावेद शेख, नंदू गेडाम, प्रकाश करंजेकर, सोनू थानथराटे, इब्रान पठान यांनी मदतीचा हात दिला. तब्बल ५१ हजार रूपयांची मदत या भावंडांच्या सुपूर्द केली.
साकोली येथील मित्रांचा व्हॉटअॅपवर सितारे नावाचा ग्रृप आहे. या ग्रृपच्या सदस्यांना तिडके परिवारातील भावंडांची व्यथा माहित झाली. ग्रृपच्या माध्यमातून काही मदत करता येईल काय, यावर विचार करण्यात आला. याच ग्रृपवर सदस्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले. काही दिवसातच तब्बल ५१ हजार रूपयाची मदत गोळा झाली. ही मदत तीन भावंडांच्या सुपूर्द करण्यात आली. भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना ही मदत मोलाची ठरणार, यात कुणालाही शंका नाही.