गारपीटग्रस्तांना मदत द्या
By Admin | Updated: March 5, 2016 00:34 IST2016-03-05T00:34:23+5:302016-03-05T00:34:23+5:30
मागील चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात झालेल्या वादळी पाऊस झाला. यात कापणीयोग्य तूर, चना, लाखोरी आदी रबी पिके घरी नेण्याची वेळ आली असताना निसर्गाने तोंडचा घास पळविला.

गारपीटग्रस्तांना मदत द्या
राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : मदत न दिल्यास आंदोलन करू
भंडारा : मागील चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात झालेल्या वादळी पाऊस झाला. यात कापणीयोग्य तूर, चना, लाखोरी आदी रबी पिके घरी नेण्याची वेळ आली असताना निसर्गाने तोंडचा घास पळविला. आधीच कर्जात असलेल्या शेतकऱ्यांचे निसर्गाने कंबरडे मोडले. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी केली.
यावेळी ते म्हणाले, धान पिकांचे ३३ टक्के नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल, असे राज्य शासनाने घोषित केले होते. पंरतु भंडारा जिल्ह्यात ६० ते ६२ पैसेवारी जाहीर केल्यामुळे ही गाव ३३ टक्के निकषात बसत असूनही अद्याप एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची ४० हजार रूपये हेक्टरी नुकसानभरपाई देण्यात यावी, धानाची आधारभूत केंद्रात विक्री झाल्यानंतर चार दिवसाच्या आत धानाचे चुकारे दिले जातील, असे सांगितले होते. परंतु एकाही ठिकाणी चार दिवसात पैसे देण्यात आले नाही. ते चुकारे तातडीने देण्यात यावे, हिवाळी अधिवेशनात प्रति क्विंटल २०० रूपये जाहीर केलेला बोनस देण्यात यावा, पावसामुळे विटभट्टीचे झालेले नुकसान पंचनामे करून देण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती शुभांगी रहांगडाले, विठ्ठल कहालकर, भगीरथ धोटे, गुणवंत काळबांडे उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)