वाहनचालकांनी जागरूक होण्याची गरज : गतवर्षी रस्ते अपघातात १७८ जणांचा मृत्यूभंडारा : राज्यात हेल्मेटची सक्ती करण्याबाबतचा सुतोवाच परिवहनमंत्र्यांनी केले. त्यांच्या या निर्णयाला विविध स्तरातून पाठिंबा मिळण्याची गरज आहे. जिल्ह्यात मागील वर्षात (२०१५) रस्ते अपघातात १७८ जणांचा मृत्यू झाला. दरवर्षी रस्ते अपघातात होणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण पाहता, हेल्मेट सक्तीचा निर्णय अतिशय स्वागतार्ह असल्याचे मत वाहनचालकांनीही व्यक्त केले आहे.भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या सन २०११ नुसार ११लक्ष ९८ हजार ८१० आहे़ भंडारा जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत घट व्हावी, असा उद्देश वाहतूक विभागाचा असला तरी मागील वर्षभरात अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. यात १७८ जणांचा अपघातात मृत्यू झाला़ तर ६३७ जण जखमी झाले. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा सतत वाढत असतानाही वाहतूक विभागाच्या उपाययोजना केवळ रस्ता सुरक्षा अभियानापुरत्याच असतात. हे अभियान एक आठवडा म्हणून राबविण्यात येत असले तरी याची प्रभावी अंमलबजावणी वर्षभर करण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्याअर्थाने हे काम यशस्वी होईल. (प्रतिनिधी)हेल्मेट वापरासंबंधीचे गैरसमजहेल्मेटमुळे मानेचा आणि पाठीचा आजार होऊ शकतो, हा चुकीचा गैरसमज आहे. अस्थिरोग तज्ज्ज्ञांच्या मते हे म्हणणे अशास्त्रीय आहे. मानेच्या आणि पाठीच्या कण्याच्या चुकीच्या हालचाली आणि बैठकीमुळे स्पाँडिलायटीस होतो. हेल्मेटमुळे जर हे आजार झाले असते तर क्रिकेटमधील विकेट कीपर जड वजनाचे हेल्मेट घालून दिवसभर मैदानात राहतो. त्याला स्पाँडिलायटीस होत नाही. हेल्मेट वापरणे फार कटकटीचे आहे, हा दुसरा गैरसमज. हेल्मेट प्रत्येक ठिकाणी सांभाळत बसावे लागते, असेही काही जण सांगतात. मात्र आजकाल दुचाकीला हेल्मेट लॉक करून ठेवण्याची व्यवस्था असते. त्यामुळे ते चोरीला जाण्याची भीती नाही व हातात बाळगण्याची गरज नाही. हेल्मेटमुळे जीव गुदमरतो, असा एक गैरसमज आहे. तो चुकीचा असून हेल्मेटला व्हेंटीलेशनची व्यवस्था असते. पावसाळ्याच्या दिवसातही विंडशिल्डच्या आतील भागावरती वाफ थंड होऊन पारदर्शकता कमी होते. रस्ते अपघातात अनेक जण मृत्युमुखी पडतात. हेल्मेट वापरले नाही, अशा लोकांचा यामध्ये अधिक समावेश आहे.. असे अनेकांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्टपणे दिसून येते.
हेल्मेटच वाचवू शकतो तुमचा अमूल्य जीव
By admin | Updated: February 12, 2016 01:26 IST